

चाकण, ता. ५ : आंबेठाण (ता. खेड) येथे ऊस तोडीच्या वसुलीच्या पैशाच्या वादातून अपहरण करणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली. तसेच, अपहृत व्यक्तीची २४ तासांच्या आत सुटका केली.
याबाबत उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, आंबेठाण येथील घाटे वस्ती येथून तीन रिक्षांमधून आलेल्या व्यक्तींनी रविवारी (ता. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजेश चव्हाण यांचे त्यांच्या दुचाकीसह अपहरण केले. याबाबत त्यांची पत्नी सुषमा यांनी फिर्याद दिली. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने अपहृत व्यक्तीच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेता पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत आरोपी अमोल रामराव राठोड (वय २९), सचिन रामराव राठोड (वय २५), नीलेश संतोष राठोड (वय २७, सध्या रा. खराबवाडी, मूळ रा. यवतमाळ) यांना शिक्रापूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला. त्यांच्याकडील अधिक तपासात हा गुन्हा संदीप गुलाब राठोड (रा. यवतमाळ) याच्या ऊस टोळीचे उचल पैसे राजेश चव्हाण हा घेऊन आल्याने एकूण आठ जणांनी मिळून केला होता. यामध्ये आरोपींनी राजेश चव्हाण याचे घाटे वस्तीतून तीन रिक्षांमधून अपहरण केले. त्याला त्याच्या दुचाकीसह घेऊन गेले होते. महाळुंगे पोलिस तपास पथकाने तात्काळ हालचाली करून दिंडाळा (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथून आरोपींना ताब्यात घेतले. राजेश चव्हाण याची गुन्हा घडल्यापासून २४ तासांच्या आत सुखरूप सुटका केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शुभम प्रल्हाद जाधव (वय २५), संदीप गुलाब राठोड (वय ४२), इंदल थावरा जाधव (वय ४०), राजू बापूराव चव्हाण (वय ४४) (सर्व राहणार दिंडाळा), संदीप उदयभान जाधव (वय ३२, रा. नाईकनगर तांडा, ता. हातगाव, संभाजीनगर) या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार, तीन ऑटो रिक्षा, अपहृत व्यक्तीची दुचाकी, आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे हे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, सहाय्यक पोलिस फौजदार यदू आढारी, पोलिस हवालदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, पोलिस शिपाई बापूराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर, समीर महात यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.