Chakan News : खेड तालुक्यात अनधिकृत प्लॉट पाडून विक्रीचा गोरखधंदा जोरात; बडी धेंडे, काही गुंड यात व्यस्त

नियम धाब्यावर बसवून प्लॉट विकण्याचा गोरखधंदा अनेक बड्या धेंड्यानी, गुंडानी व इतर लोकांनी महसूल विभागाला हाताशी धरून चालविला आहे.
Khed Tahsil Illegal Plotting
Khed Tahsil Illegal Plottingsakal

चाकण - जमिनीच्या गुंठेवारीला शासनाने बंदी घातली आहे. तरीही गुंठेवारी करून नियमबाह्य बेकायदा खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, महाळुंगे, राजगुरूनगर परिसर, कुरुळी, वराळे, भांबोली, शिंदे, खालुंब्रे, आंबेठाण, वाकीखुर्द, वाकी बुद्रुक, आसखेड, करंजवहिरे, येलवाडी, रासे, भोसे, मेदनकरवाडी, काळुस, शेलपिंपळगाव, वडगावघेणंद, शेलगांव, चऱ्होली खुर्द, सोळू, मरकळ, नाणेकरवाडी, चिंबळी, मोई, बिरदवडी, कडाचीवाडी, खराबवाडी, कोयाळी या गावात प्लॉटची खरेदी -विक्री जोरात बेकायदा सुरु आहे.

शासकीय नियमानुसार लेआऊट तयार करून संबंधित विभागाची मान्यता घेऊन प्लॉटची विक्री करावी असा नियम आहे. हा नियम धाब्यावर बसवून प्लॉट विकण्याचा गोरखधंदा अनेक बड्या धेंड्यानी, गुंडानी व इतर लोकांनी महसूल विभागाला हाताशी धरून चालविला आहे. यात सामान्य नागरिकांची फसवणूक होत असून जिल्हाधिकारी यांनी तसेच पीएमआरडीए च्या आयुक्तांनी लक्ष द्यावे. संबंधितावर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांची आहे.

चाकण, ता. खेड हा परिसर मोठ्या औद्योगिक वसाहतीचा आहे.राज्यातच नव्हे तर देश पातळीवर, जागतिक पातळीवर चाकण प्रसिद्ध आहे.हा परिसर पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच मुंबईला जवळ असल्याने मोठा निसर्ग सौंदर्य पश्चिम डोंगराळ भाग लाभल्याने तसेच दोन धरणे असल्याने या भागात जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने या भागाला समृद्धी आली आहे.

खेड तालुक्यातील विविध भागात तसेच चाकण परिसरात औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील गावात प्लॉटिंगला मोठा उत आला आहे. प्लॉट च्या विक्रीतून इझी मनी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अनेक बडी धेंडी, गुंड, काही कार्यकर्ते, पदाधिकारी, काही व्यवसायिक, उद्योजक या व्यवसायात गुंतले आहेत.

बाहेरून येणारे धनदांडगे लोक, कामगार वर्ग, पोलीस अधिकारी, पोलीस, काही महसूल अधिकारी गुंतवणूक म्हणून तसेच घर, बंगला, सेकंड होम बांधणे व छोटीमोठी शेती घेणे पसंत करत आहेत.त्यामुळे खेड तालुका तसेच चाकण, आळंदी, राजगुरूनगर या परिसराचा विस्तार मोठया प्रमाणात वाढला आहे, वाढत आहे.

बेकायदा प्लॉट पाडून काही सोयी, सुविधांची अमिषे देऊन विक्री करण्यात येत आहे. परिसरातील शेत जमिनी अकृषिक करून, इंडस्ट्रियल करून बोगस झोन दाखले ग्राहकांना दाखवून प्लॉट विक्रीचा बेकायदा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून कोट्यावधींची उलाढाल होत आहेत. बेकायदा दस्तऐवज नोंदणी कार्यालयात केले जात आहेत. तेथेही नोंदणी करण्याचे दर गुंठ्या मागे ठरलेले आहेत.

अगदी एका गुंठ्याला नोंदणी कार्यालयात दहा ते वीस हजार रुपये दर ठरलेले आहेत.तसेच दस्तऐवज तयार करणे, मुद्रांक, नोंदणी शुल्क त्याचा खर्च वेगळाच आहे. बेकायदा प्लॉटिंग करून अगदी भर बागायती शेतीतही प्लॉटिंग करून रस्ते टाकून अगदी तात्पुरते नळाचे जोड देऊन सांडपाणी विल्हेवाटेची दिशा दाखवून, तात्पुरती जलवाहिनी टाकून काही झाडे लावून कंपाऊंड टाकून रंगीबेरंगी झेंडे लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रस्त्यावर तात्पुरती डांबराची मलमपट्टी दाखवून काँक्रिटीकरण करून ग्राहकांना भुलभुलय्या केला जात आहे. बेकायदेशीर प्लॉट विक्री करणाऱ्यांनी अगदी प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांसाठी सोन्याची बक्षीसे, दुचाकी, अगदी कारची बक्षीसे ही ठेवली आहेत. त्यातून ग्राहकाला फसविले जात आहे. असे अनेक प्रकार घडत आहेत.

काही पोलीस ठाण्यापर्यंत जात आहेत तर काही जात नाही हे वास्तव आहे. प्लॉट विक्री करणाऱ्यांना काही ग्रामपंचायती नोटीसा पाठवते. परंतु त्या नोटिसाचे पुढे काहीच होत नाही. आर्थिक सेटलमेंट होऊन 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असे प्रकार घडत आहे अशी चर्चा रंगते आहे.

शेतकऱ्यांना जमीन मालकांना काही लाख रुपये देऊन विसार पावती करायची, दस्तऐवज करायचा आणि जमीन ताब्यात घ्यायची. त्याच्यावर बेकायदा प्लॉटिंग करायचे हा धंदा मात्र सुरु आहे. बेकायदा प्लॉट विक्रीमुळे चाकण, खेड, आळंदी परिसरातील जमिनीचे एकरीचे भाव अगदी एक, दोन, तीन कोटी पर्यंत गेलेले आहेत.

प्लॉटचा खेड तालुक्यात एका गुंठ्याला भाव साधारणपणे सहा ते पंधरा, वीस लाख रुपयापर्यंत आहे. विक्री करताना आधी काही रक्कम बुकिंग घ्यायची. टप्प्याटप्प्यात रक्कम ग्राहकाकडून घ्यायची आणि अकरा गुंठे जमीन विक्री झाल्यानंतर खरेदीखत करायचे असा फंडा आहे.

खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गुंठेवारी करण्यात येत आहे. यामध्ये काही लोकांना राजकीय वरदहस्त आहे. परिसरात काही जमिनी डॉक्टर, पोलीस अधिकारी, पोलीस, देशी-विदेशी हॉटेल, बार दुकानाचे मालक तसेच काही उद्योजक, व्यवसायिक,पुढारी खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकरी योग्य भाव मिळाल्यानंतर जमीनी विकत आहे हे चित्र आहे.

चाकण परिसरात बेकायदा प्लॉटिंग विक्री करणाऱ्या पिंपरी-चिंचवड परिसरातील एका मोठ्या व्यावसायिकावर आयकर विभागाने धाड टाकल्याची चर्चा रंगली होती. त्यात काही बडे पुढारी त्या व्यवसायिकाबरोबर गुंतले असल्याची चर्चा होती. पिंपरी-चिंचवड परिसरातील एका व्यवसायिकाने चाकण परिसरात महाळुंगे परिसरात अगदी शंभर एकरवर जमिनी खरेदी केल्या आहेत अशीही चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com