खेड तालुक्यात महाविकास आघाडी फक्त वाढदिवसापुरती | Mahavikasaghadi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikasaghadi
खेड तालुक्यात महाविकास आघाडी फक्त वाढदिवसापुरती

खेड तालुक्यात महाविकास आघाडी फक्त वाढदिवसापुरती

आंबेठाण - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. नुकत्याच पार पडलेल्या काही निवडणूका या तीनही पक्षांनी एकत्र लढविल्या आहेत. परंतु खेड तालुक्यात मात्र या महाविकास आघाडीत काहीच आलबेल नसल्याचे चित्र आहे. खेड तालुक्यात महाविकास आघाडी ही फक्त भाषणापुरती आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा पुरती मर्यादित असल्याची परिस्थिती दिसत आहे. पंचायत समितीच्या इमारतीवरून सुरू झालेली आघाडीतील बिघाडी अजूनही सुरळीत झालेली दिसत नाही.

राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षात तालुक्यात म्हणावा असा सुसंवाद दिसत नाही. याची प्रचिती पंचायत समिती इमारत वाद आणि त्यानंतर पंचायत समिती सभापती पदावरून झालेला गोंधळ यावरून येत आहे. पंचायत समिती सभापतीपदासाठी तीनही पक्ष मिळून स्पष्ट बहुमत असताना राष्ट्रवादीने शिवसेनेच्या नाराज सदस्यांना सोबत घेत सभापतीपद मिळविले आणि एकहाती सत्ता ताब्यात घेतली आणि त्यावर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या अरुण चौधरी सभापती झाले. तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक आलेल्या अमर कांबळे यांची उपसभापतीपदी वर्णी लागली. त्यांनाही अल्पावधीतच राजीनामा द्यावा लागल्याने ही पदे ही शोभेची ठरत आहेत. तालुक्यात ही घडामोड घडल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठांना यात लक्ष घालावे लागले होते.संजय राऊत यांनी तर तालुक्यात पत्रकार परिषद घेतल्याने तालुक्यातील राजकीय हवा चांगलीच तापली होती.

हेही वाचा: वर्षभरात 80 आगीच्या घटनांवर नियंत्रणl; तर 20 बचाव कार्य

तीनही पक्षांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून पंचायत समिती सभापती पद निवडणूकीला सामोरे गेले असते तर सहजपणे सत्ता त्यांच्याच ताब्यात राहिली असती. कारण भाजपचा एकच सदस्य पंचायत समितीत आहे. परंतु असे न करता राष्ट्रवादीने स्वतःची ताकत वाढविण्यासाठी ही खेळी करून अन्य पक्षाच्या मानाने एक पाऊल पुढे टाकले आहे. शिवसेनेत मात्र माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शांताराम भोसले ( भाजप तालुकाध्यक्ष ) -

तालुक्यात अन्य पक्षांची महाविकास आघाडी आहे की नाही हे त्यांचे त्यांना माहीत. पण आम्ही मात्र पुढील काळात सर्व निवडणूका पक्षाच्या चिन्हावर आणि स्वबळावर लढविणार असून सहकारातील निवडणुकासंदर्भात त्यावेळी निर्णय घेऊ.

loading image
go to top