जावयाच्या आईचे सासूकडून अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मुलीच्या घरच्यांचा विरोध झुगारून तरुणाने प्रेयसीसोबत पळून जाऊन विवाह केला. त्याच्या रागातून या तरुणीच्या आईने तिची लहान बहीण व तिच्या मित्राच्या मदतीने मुलाच्या आईचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तीन तासांत तपास करून अपहृत महिलेची सुटका केली. 

पुणे - मुलीच्या घरच्यांचा विरोध झुगारून तरुणाने प्रेयसीसोबत पळून जाऊन विवाह केला. त्याच्या रागातून या तरुणीच्या आईने तिची लहान बहीण व तिच्या मित्राच्या मदतीने मुलाच्या आईचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तीन तासांत तपास करून अपहृत महिलेची सुटका केली. 

कविता संजय घोलप (वय 40) अंजली संजय घोलप (वय 19, रा. वडगाव शेरी) आणि तुषार बबन चौधरी (वय 21, रा. बोलगाव, ता. खेड) यांना पोलिसांनी अटक केली. धानोरीतील 49 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. 

विश्रांतवाडीतील केकान पेट्रोल पंपाजवळून महिलेला जबरदस्तीने मोटारीतून नगरच्या दिशेने नेले जात आहे, अशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत ज्या महिलेचे अपहरण झाले आहे, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिलांनी तिच्याबद्दल माहिती दिली. महिलेच्या मोबाईलचे लोकेशन काढून पोलिसांनी आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. फुलगावपर्यंत मोटारीचा पाठलाग केला. काही वेळाने मोटार वढू बुद्रुककडे गेल्याचे कळाले. तेथे मोटार रोखली. तेव्हा महिलेला भरपूर मारहाण झाली होती. चौधरी याने पट्ट्याने मारल्याने या महिला जखमी झाली होती. 

पोलिसांनी तिघांची चौकशी केली. त्या वेळी फिर्यादी यांच्या मुलाने कविता यांच्या मुलीशी गुढीपाडव्याला पळून जाऊन लग्न केले आहे. आमची मुलगी परत पाहिजे, ते दोघे सापडत नसल्याने मुलाच्या आईचे अपहरण केले, अशी कबुली दिली. याप्रकरणी विश्रांतवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping of son in law mother her mother in law