प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोन यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; नात्यातील जिव्हाळा आणि त्यागातून दोघांना मिळाले नवजीवन

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोन यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; नात्यातील जिव्हाळा आणि त्यागातून दोघांना मिळाले नवजीवन
Published on: 

LIN26A00134
लोणी ः पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. याप्रसंगी वैद्यकीय पथक.

दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

लोणी, ता. २४ ः येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नुकत्याच दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. एका शस्त्रक्रियेत धाकट्या भावाने मोठ्या भावाला, तर दुसऱ्या शस्त्रक्रियेत वडिलांनी मुलाला किडनीदान केले. या दोन्ही शस्त्रक्रियांमुळे दोघांना नवजीवन मिळाले. त्यांची प्रकृती आता समाधानकारक असून, त्यांना नुकतेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही शस्त्रक्रिया आणि त्यासाठीच्या सर्व वैद्यकीय सुविधा रुग्णालयामार्फत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या.

पहिल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील गणेश अंकुश घुले (वय ३०) यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यांचे धाकटे भाऊ संतोष अंकुश घुले यांनी मोठ्या भावाला नवजीवन मिळावे, यासाठी स्वखुशीने किडनीदान करण्याचा निर्णय घेतला. भावाच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेला हा त्याग भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

दुसऱ्या शस्त्रक्रियेत भिंगार येथील रहिवासी मोहम्मद अख्तर (वय ४८) यांनी आपल्या २२ वर्षीय मुलगा मोहम्मद अफजल याला किडनीदान केले. मुलाला नवजीवन मिळावे, यासाठी वडिलांनी घेतलेला हा निर्णय पालकांच्या निस्सीम प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक ठरला.

प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी डॉ. राजेंद्र विखे पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे अहिल्यानगरसह मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांतील सुमारे सहा ते सात जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना या रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध होत आहे.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना नवजीवन मिळत असून, अवयवदानाचे महत्त्वही समाजापर्यंत पोहोचत आहे. या शस्त्रक्रियांमध्ये रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रुग्णालयाचे प्रशासक संचालक डॉ. योगींद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. एन. एस. पवार, डॉ. जोर्वेकर, डॉ. तुषार भवर, डॉ. एस. एल. तुंगीकर आणि डॉ. काजल दरंदले यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com