किरण राज यादव बारामती नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुस्कर यांची बदली करण्यात आली

बारामती : नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त किरणराज यादव यांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

किरणराज यादव यांनी तातडीने बारामती नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारावा अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून योगेश कडुस्कर यांची बदली होणार अशा प्रकारचे संकेत मिळत होते, अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. बारामती नगरपालिकेच्या विकासकामांना वेगाने पुढे नेण्याचे आव्हान किरणराज यादव यांच्यासमोर असेल.

दरम्यान किरणराज यादव यांनी यापूर्वीही बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. मात्र त्यावेळेस बारामती नगर परिषदेला अ वर्ग दर्जा प्राप्त नव्हता. आता बारामती नगरपरिषदेची हद्दवाढ झाली असून बारामती नगर परिषदेला अ वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अ वर्ग नगरपालिका असलेली बारामती नगरपरिषद एकमेव आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा मतदारसंघ असल्याने बारामती नगर परिषदेवर त्यांचे वैयक्तिक लक्ष असते. त्यांच्या कामाच्या गतीला स्वीकारून काम करणारे अधिकारी अजित पवार बारामती आणतात, असा पायंडा आहे.

त्यामुळे किरण राज यादव यांना आगामी काळात बारामती नगरपालिकेच्या विकासकामांना वेगाने गती देणे गरजेचे राहणार आहे. नगरसेवकांचे गट गट आणि स्थानिक राजकारण यांचा सामना करत विकासकामांना वेगाने मार्गी लावण्याचे आव्हान किरणराज यादव यांच्यासमोर असेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बारामती पूर्वी काम केलेले राहुल काळभोर यांना नुकतेच पुन्हा गटविकास अधिकारी पदी आणण्यात आलेले आहे, तर आता मुख्याधिकारी म्हणून पूर्वी काम केलेल्या किरणराज यादव यांना पुन्हा एकदा बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kiran Raj Yadav is the new Chief Officer of Baramati Municipality