ड्रेनेज तुंबल्याने दुकानांमध्ये शिरले पाणी; किरकटवाडीतील व्यावसायिकांचे नुकसान

Kirkatwadi_Shops
Kirkatwadi_Shops

किरकटवाडी (पुणे) : सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे ड्रेनेज तुंबून किरकटवाडी (ता.हवेली) येथील सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या दोन इमारतींमधील जवळपास वीस दुकानांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी शिरले. लॉकडाउननंतर व्यवसाय सुरळीत होत असताना सलग दोन दिवस दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

किरकटवाडीतील सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या शिवनगर या भागातील अमृता विहार सोसायटी आणि मोरया कॉर्नर या दोन इमारतींमधील तळमजल्यावर असलेल्या दुकानांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी शिरले. व्यावसायिक मिळेल त्या साधनांच्या आधारे पाणी काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पाऊस येत असल्याने दुकानामध्ये पुन्हा पाणी शिरत होते. या इमारतींमध्ये इलेक्ट्रॉनिक, पशुखाद्य, बी बियाणे आणि खते, हॉटेल, स्टेशनरी, मोटार रिवायडींग, फ्लेक्स प्रिंटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. सलग दोन दिवस दुकानांमध्ये पाणी भरल्यामुळे या सर्व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले. ड्रेनेज तुंबत असल्याने या दुकानांमध्ये पाणी शिरत आहे. प्रशासनाकडून याकडे अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही.

"शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस दुकानांमध्ये पाणी शिरत आहे. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात माल आहे. पाणी शिरल्यानंतर खते आणि बियाणे पूर्णपणे खराब होत आहेत. परिसरातील तीन ड्रेनेज लाइन एका ठिकाणी एकत्र येतात आणि एका पाईपमधून सर्व ड्रेनेज पुढे जाण्याची व्यवस्था आहे, जी अपुरी पडत आहे. सदर ड्रेनेज व्यवस्था प्रशासनाने तात्काळ सुरळीत करणे आवश्यक आहे."
- धनाजी राऊत, व्यावसायिक, कृषी सेवा केंद्र.

"ड्रेनेज लाईनमध्ये काहीतरी अडकले असण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने तातडीने या परिसरातील संपूर्ण ड्रेनेज लाईनची पाहणी करून ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे. ड्रेनेजमधील सर्व घाण दुकानांमध्ये शिरत आहे. आता कुठे व्यवसाय सुरळीत होत आहेत, त्यातच अशा घटनांमुळे पुन्हा नुकसान होत आहे."
- संजय कोल्हे, हॉटेल व्यावसायिक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com