
पर्यावरणाला वाहिलेला ‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ येत्या २० ते २३ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.
Pune News : ‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ २० जानेवारीपासून
पुणे - पर्यावरणाला वाहिलेला ‘किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव’ येत्या २० ते २३ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत देण्यात येणारा ‘वसुंधरा सन्मान’ यंदा पाँडिचेरीच्या ऑरोविल येथील सॉलिट्यूड फार्म आणि ऑरगॅनिक किचनचे संस्थापक कृष्णा मॅकेन्झी यांना जाहीर झाला आहे. महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याप्रसंगी किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, ‘फॅसिलीटेटर’ आनंद चितळे, क्युरेटर डॉ. गुरूदास नूलकर आणि महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते. यावेळी महोत्सवाच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.
यंदाचा ‘पर्यावरण पत्रकारिता सन्मान’ भूज येथील पर्यावरण पत्रकार आणि वन्यजीव छायाचित्रकार रोनक गज्जर यांना, तर ‘डी. डब्ल्यु. इको इंडिया’ या पर्यावरणविषयक दृकश्राव्य नियतकालिकाला फिल्ममेकर पुरस्कार देण्यात येणार आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा या विषयावर लक्ष केंद्रित करणारा पहिला महोत्सव असेल. ‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ हा या महोत्सवाचा विषय आहे. महोत्सव विनामूल्य प्रदर्शित केला जाणार असून bit.ly/kviff23 या लिंकद्वारे नावनोंदणी करणे बंधनकारक आहे,’’ असे किर्लोस्कर यांनी सांगितले.
महोत्सवाची वैशिष्ट्ये -
- भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत महोत्सवाचे प्रक्षेपण
- सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या वेळेत पुनःप्रक्षेपण
- सुमारे १०० हून अधिक लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन
- तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, निसर्गसंवाद, दृकश्राव्य व्याख्याने आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रम
- ‘मनमोहक भारत’ विषयावरील ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शन