
पुणे : किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवाचे आयोजन
पुणे : राम नदी पुनरुज्जीवन अभियाना अंतर्गत ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे दुसरे वर्ष असून हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तीन दिवसीय महोत्सवात विविध पर्यावरण तज्ज्ञ सहभाग घेत मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नदी महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांचे नदीशी नाते निर्माण व्हावे, नद्यांच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा व त्यांची स्वच्छता राख्यण्यासाठी तरुण पिढी प्रेरित व्हावी यासाठी हे महोत्सव अत्यंत महत्त्वाचे आहे. महोत्सव २५ ते २७ या कालावधीत किर्लोस्कर वसुंधराच्या फेसबुक पेजवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. माया महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व लेखक प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. राम नदी पुनरुज्जीवन अभियाना मार्फत गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांवर आधारित चित्रपटे या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. तसेच राम नदी विषयक कल्पक उपक्रम, कार्यशाळा व निसर्ग परिक्रमांवर आधारित चित्रपटांचा समावेश आहे.