अय्या!..पुरुष बनताहेत किचनकिंग

माधुरी सरवणकर 
शनिवार, 25 जानेवारी 2020

पत्नी बॅंकेत मॅनेजर आहे. तिला घरी यायला उशीर होतो. त्यामुळे आपल्यालाही स्वयंपाक आला पाहिजे, अशी भावना मनात निर्माण झाली. गोखले यांनी रोजचा स्वयंपाक विशेष टिप्स देऊन शिकविला. आता स्वयंपाकात पत्नीला माझी मदत होते. यामुळे तिला मला आणि करिअरसाठीही वेळ देता येत आहे. 
- सचिन कुलकर्णी, अभियंता

स्वयंपाक घरातसुद्धा स्त्री-पुरुष समानता यावी, या उद्देशाने हा क्‍लास चालू केला. प्रत्येकाला जेवण बनवता येत असेल तर पथ्याचा स्वयंपाकसुद्धा स्वतः करता येईल आणि आरोग्य राखता येईल. तसेच यामुळे कुटुंबातील प्रेम वाढण्यास मदत होईल. 
- मेधा गोखले, चालक, कुकिंग चालक

पुणे - खरं तर घराचं किचन म्हणजे महिलांचं हक्काचं स्थान; पण आता हे स्थान पुरुषांनाही हवंहवसं वाटू लागलंय बरं. कोणाला आपल्या नोकरदार पत्नीला हातभार लावायचाय, कोणाला परदेशात जायचंय आणि तिथे पोटाचे हाल नको म्हणून, तर कोणाला केवळ हौसेखातर स्वयंपाक घर खुणावतेय. नुसतंच खुणावत नाही, तर ते ‘किचनकिंग’ बनू लागले आहेत.   

आपणही सात्त्विक जेवण बनवायला शिकलं पाहिजे, असा विचार पुरुषांच्या मनात येऊ लागला आहे. यात तरुण वर्गदेखील मागे नाही. स्वयंपाक शिकण्यासाठी ते खास क्‍लासही लावताहेत. नारायण पेठेतील मेधा गोखले यांच्या क्‍लासला मिळणाऱ्या प्रतिसादातून ही बाब अधोरेखित झाली आहे. गोखले या राहत्या घरी बारा वर्षांपासून पुरुषांसाठी कुकिंग क्‍लास चालवतात. त्यांचं स्वयंपाकघर रोजच हाउसफुल्ल असतं, ते जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांचे धडे गिरविण्यासाठी. गॅस पेटविण्यापासून कुकर लावणे, पोळ्यांसाठी कणीक भिजवणे पोळ्या करणे, भाज्या कापणे आणि फोडणीला टाकणे, काम झाल्यावर स्वयंपाकघर कसे नीटनेटके ठेवायचे, अशा अनेक गोष्टी त्या शिकवितात. त्यांच्या क्‍लासमध्ये सोळा वर्षांपासून ८० वर्षांपर्यंतच्या आजोबांपर्यंत प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यवसायिक शुभम सुराणा म्हणाला, ‘‘मला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे होते. त्यामुळे खाण्या-पिण्याचे हाल होऊ नयेत म्हणून मी स्वयंपाक वर्गात येऊ लागलो. नुकतेच माझे लग्न झाले आहे आणि बायकोला सरप्राइज देण्यासाठी तिला कांदापोहे आणि चहा बनवून दिला. त्यामुळे तिला खूप आनंद झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kitchens are becoming men