पुण्यात कोणत्या वेळेला काय सुरु, काय बंद? जाणून घ्या सविस्तर नियमावली

Pune Corona
Pune Corona

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कौन्सिल हॉलमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा प्रतिनिधी, खासदार, आमदार आणि महापौरदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर पुण्यातील विभागीय आयुक्तांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पुण्यातील कोरोनासंदर्भातील नियमांबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.

कोरोनाच्या हाहाकाराने पुणे हे सर्वाधिक पीडित शहर असून दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या मोहीमेला गती द्यावी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पुणेकरांवर कसल्याही प्रकारचे नवे निर्बंध लादण्यात येणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, जे नियम सध्या लागू आहेत त्यातीलच काही नियमांमध्ये जुजबी बदल करण्यात आले आहेत, असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं. 

पुण्यातील शाळा आणि कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी या नियमामध्ये सूट राहिल. पुण्यात रात्री 10 ते सकाळी 6 संचारबंदी असणार आहे. मात्र, या दरम्यान अत्यावश्यक सुविधांसाठी संचारबंदी असणार नाही. रात्री 10 नंतर हॉटेल्स आणि बार बंद राहतील. त्याआधी 50 टक्के क्षमतेनेच ते सुरु ठेवता येतील तसेच याची माहिती देणारा तक्ता बाहेर लावावा लागेल. रात्री 10 नंतर 11 पर्यंत होम डिलीव्हरी करण्यास मुभा असेल.

लग्न-अंत्यविधी यांसारख्या कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक असून 50 पेक्षा जास्त लोकांना यामध्ये परवानगी असणार नाही. या कार्यक्रमांबाबतचे नियम मोडले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.  मॉल्स आणि सिनेमागृहे रात्री 10 नंतर बंद राहतील. खासगी सोसायटीमधील खासगी क्लब देखील बंद राहतील. MPSC परिक्षेचा विचार करता कोचिंग सेंटर आणि लायब्ररी 50 टक्के क्षमतेने कार्यरत राहू शकतात.

पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी आणि व्यायामासाठी गार्डन्स सकाळी सुरु राहतील, मात्र संध्याकाळी बंद राहतील. वाहतुक व्यवस्थाही 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याकारणाने 18 वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना पुण्यात लस देण्यात येण्याची परवानगी मिळावी, यासंदर्भातल्या हालचाली सुरु आहेत. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com