नॉलेज क्‍लस्टरची पुण्यात पायाभरणी

नॉलेज क्‍लस्टरची पुण्यात पायाभरणी

पुणे - विद्यार्थ्याने पदवी घेताना शिकलेला अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष काम करताना आवश्‍यक ज्ञान याचा संबंध नसतो, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यामुळे उद्योगांना पूरक असे शिक्षण मिळत नसल्याचा नाराजीचा सूर उद्योजक काढतात. औद्योगिक क्षेत्रातील अशा समस्येचे उत्तर शोधण्यासाठी शहरात आता ‘पुणे नॉलेज क्‍लस्टर’ची पायाभरणी सुरू झाली आहे.

प्रमुख शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्र एकत्र आल्याने पुण्याच्या परिसरातील उद्योगांच्या विकासाला यामुळे गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. चंडीगड पाठोपाठ साकार होणारे हे देशातील दुसरे ‘नॉलेज क्‍लस्टर’ आहे. 

उद्योगांच्या वेगवेगळ्या समस्यांची उत्तरे शैक्षणिक संस्थांमध्ये, शास्त्रज्ञांकडे असतात. परंतु शिक्षण संस्था, संशोधक आणि उद्योग हे तिन्ही घटक एकत्र येत नसल्याने या समस्यांचे विश्‍लेषण करून त्याचे उत्तर शोधले जात नव्हते. ‘पुणे नॉलेज क्‍लस्टर’मधून अशा समस्यांची नेमकी उत्तरे समोर येतील.  

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) संचालक प्रा. जयंत उदगावकर म्हणाले, ‘‘देशातील दुसरे क्‍लस्टर पुण्यात साकारत आहे.उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा म्हणून हे क्‍लस्टर काम करेल. त्याची प्राथमिक बैठक नुकतीच झाली.  त्याला केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसह राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एसीसीएस), आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्र (आयुका), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), राष्ट्रीय रासायनिक संस्था (एनसीएल) यासह संरक्षण विभागाचे प्रतिनिधी या उपस्थित होते.’’ 

‘‘चंडीगडमध्ये पाच वर्षांपूर्वी असे क्‍लस्टर स्थापण्यात आले. पुणे हे औद्योगिक केंद्र असून, ते शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहरदेखील आहे. त्यामुळे चंडीगडच्या तुलनेत हे क्‍लस्टर देशाच्या औद्योगिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल,’’ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात साकारणारे क्‍लस्टर नेमके कसे असेल याचा आराखडा काही तज्ज्ञ आखत आहेत, ही सुरवात आहे. त्यामुळे उद्योग, शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्र यांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेणे, हा याचा पहिला टप्पा आहे. यासाठी सुरवातीला सरकारकडून काही आर्थिक मदत मिळेल. 
- प्रा. जयंत उदगावकर, संचालक, आयसर, पुणे

काय होईल ‘क्‍लस्टर’मुळे?
 उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे शास्त्रीय निराकरण
 समस्यांवरचे शास्त्रीय आणि तांत्रिक उपाय शोधणे 
 समस्यांचा सर्वंकष विचार करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com