

कोल्हापूर, ता. ११ : देशात अघोषित आणीबाणी सुरू असून, शिक्षण व्यवस्थेची दाणादाण उडवली जात आहे. ही निवडणूक केवळ पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघापुरती मर्यादित नसून, सरकारविरोधी संताप व्यक्त करण्याची आणि दिल्लीचे तख्त उलथवून टाकण्याची हीच ती योग्य वेळ आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापुरातील मेळाव्यात रणशिंग फुंकले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात नेतेमंडळींनी राज्य व केंद्र सरकारवर तोफा डागल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले, ‘‘जयंत आसगावकर यांनी आमदारकीच्या काळात उत्कृष्ट काम केले असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. हर्षदा देशमुख-जाधव या सुस्वभावी व उच्चविद्याविभूषित उमेदवार असून त्या पदवीधरांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देतील.’’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील हुकूमशाही आणि भाजपरुपी सैतानाला रोखण्याची सुरुवात पुरोगामी कोल्हापुरातूनच होईल असे मत मांडले. ‘‘संस्कृतीचे उपदेश देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आयाबहिणींवर हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला?,’’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. तर, परिवर्तनाची सुरुवात हे गोकूळ व पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून होणार आहे, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
तरुणांना स्थिरता आणि समान संधी मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले. तर जयंत आसगावकर यांनी मी पूर्वीसारखाच सदैव शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या सेवेत कार्यरत राहीन, असे प्रतिपादन केले.
मेळाव्यास माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज पाटील, राजू लाटकर, व्ही. बी. पाटील, मेहबूब शेख, सारंग पाटील, विजय नाडकर, प्रभाकर देशमुख, राजू आवळे, शिवाजी खांडेकर आदी उपस्थित होते.
........
माझे १०० टक्के सहकार्य हर्षदा जाधव यांनाच राहील. ३० ऑक्टोबरला जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांचा आमदार म्हणून सत्कार याच कोल्हापुरात होईल.
- सतेज पाटील, आमदार
.....
फोटो ः 57161
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.