

कोल्हापुरात दोन महिन्यांत
चाराटंचाईची शक्यता
चारा प्रकल्प उभारणार; ‘जिल्हा नियोजन’चा निधी वापरणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनाने चाऱ्याची कमतरता भासू नये. अन्य जिल्ह्यांनी चाऱ्याची मागणी केली तर त्यांनाही चारा देता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्ह्यात चारा निर्मितीचे मोठे प्रकल्प जिल्हा परिषदेने उभे करावेत, अशा सूचनाही दिल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. उसाची तोडणी झाल्यावर राहाणारे वाडे (पाचट) जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरता येते. काही ठिकाणी हा पाला ऊस तोडणी मजूर घेऊन जातात आणि शेतकऱ्यांना विकतात. तर काही ठिकाणी शेतकरी पाला मजुरांकडून घेतात. त्यामुळे गळीत हंगाम सुरू असेपर्यंत चाऱ्याची उपलब्धता होईल. त्यानंतर मात्र चाऱ्याची कमतरता भासेल. यावर्षी पावसाळ्यात अल निनोमुळे पाऊस कमी झाला. त्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी आहे. तसेच परतीचा पाऊसही कमी होता. त्याचाही परिणाम चारा उपलब्धतेवर झाला आहे. याची झळ पुढील दोन महिन्यांत वाढेल. यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. ज्यांच्या शेतातील भात कापणी झाली आहे. त्यांनी चाऱ्याचे पीक घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी आवश्यक असणारे बियाणे जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यांना शेतामध्ये चारा लागवड करणे शक्य आहे त्यांनी चारा लागवड करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
--- कोट ---
जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पशुपालक विभागाने आराखडा बनवला आहे. कृषी आणि महसूल विभाग त्यांना आवश्यक ती मदत करत आहेत. जिल्ह्यात चाऱ्याची कमतरता निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाची सिद्धता सुरू आहे.
- डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.