कोंढेज ग्रामस्थांनी राबवली थर्माकोल व प्लास्टिक मुक्त हरिनाम सप्ताहाची संकल्पना

कोंढेज ग्रामस्थांनी राबवली थर्माकोल व प्लास्टिक मुक्त हरिनाम सप्ताहाची संकल्पना
Published on

CKL26B03167
कोंढेज (ता. करमाळा) ः येथील हरिनाम सप्ताहात पंगतीसाठी वापरण्यात आलेली स्टीलची ताटे.

हरिनाम सप्ताहात प्लास्टिकला फाटा; कोंढेजचा पर्यावरणपूरक उपक्रम
स्टीलच्या ताटे अन् ग्लासांत पंगती; ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक

चिखलठाण, ता. २७ : हरिनाम सप्ताह म्हटले की सात दिवसांच्या पंगती, हजारो भाविक अन् मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पत्रावळी व ग्लासांचे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र, करमाळा तालुक्यातील कोंढेज ग्रामस्थांनी या परंपरेला पर्यावरणपूरक पर्याय दिला आहे. यंदाचा अखंड हरिनाम सप्ताह प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्त करण्याचा निर्णय घेत ग्रामस्थांनी पंगतीसाठी स्टीलच्या ताटे अन् ग्लासांचा वापर केला. त्यामुळे सात दिवसांच्या कार्यक्रमात प्लास्टिक अन् थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला.

श्रावणातील अखंड हरिनाम सप्ताहात नाश्त्यासह दिवसभरात तीन वेळा पंगती होतात. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पत्रावळी अन् ग्लास वापरले जातात. कार्यक्रमानंतर हा कचरा गावातच पडून राहत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन कोंढेज ग्रामस्थांनी यंदा सप्ताहच प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला.
निर्णय घेतल्यानंतर ताटांची व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न होता. मात्र, ग्रामस्थांच्या आवाहनाला दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद दिला. शहाजी राऊत यांनी १२५ स्टीलची ताटे दिली. हरिभाऊ इंगोले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील सर्व पोलिस मित्र मंडळांनी २०० ताटे उपलब्ध करून दिली. अनिल आदलींग यांनी स्टीलचे ग्लास भेट दिले. त्यामुळे पंगतींसाठी प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर करण्याची गरजच भासली नाही.

गेल्या वर्षी सुचली संकल्पना
मूळचे कोंढेज येथील रहिवासी अन् सध्या जेऊर येथे व्यवसायानिमित्त राहणारे नितीन मेहता यांनी गेल्या वर्षीच्या सप्ताहावेळी प्लास्टिकमुक्त सप्ताहाची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली होती. त्यावेळी त्यावर चर्चा झाली. यंदा ग्रामस्थांनी ती प्रत्यक्षात आणली.

कोट
- थर्माकोलच्या पत्रावळी अन् प्लास्टिकचे ग्लास प्रदूषणासोबतच आरोग्यासाठीही अपायकारक आहेत. त्यामुळे अशा वस्तूंमध्ये देवाचा प्रसाद देणे योग्य वाटले नाही. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित निर्णय घेऊन प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्त सप्ताह साजरा केला.
- सतीश लोंढे, ग्रामस्थ, कोंढेज

कोट
- गेल्या वर्षी नितीन मेहता यांनी प्लास्टिकमुक्त सप्ताहाची संकल्पना मांडली होती. यंदा ग्रामस्थांनी ती प्रत्यक्षात आणल्याने मोठा आनंद होत आहे.
- सुभाष इंगोले, ग्रामस्थ, कोंढेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com