कोपरगाव १६ गावात एक गाव एक गणपती

कोपरगाव १६ गावात एक गाव एक गणपती
Published on

गट-तट विसरले, गणरायासाठी एकत्र आले!
कोपरगाव तालुक्यात १६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’; पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद
कोपरगाव, ता. १६ ः राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या कोपरगाव तालुक्यात यंदाचा गणेशोत्सव मात्र एकीचा संदेश देणारा ठरत आहे. राजकीय प्रभावाच्या तालुक्यात गावपातळीवरील गट-तट अनेक वर्षांपासून कायम असले, तरी गणरायाच्या उत्सवासाठी ग्रामस्थांनी हे मतभेद बाजूला सारले आहेत. तालुक्यातील संवत्सरसह तब्बल १६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ बसवून सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या संवत्सर गावात सर्व राजकीय गट-तट बाजूला ठेवून ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात आली. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५८ गावांपैकी १५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या हद्दीत एकूण १७९ गणेश मंडळे आहेत. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तीन अधिकारी, ३० पोलिस व २५ होमगार्ड, असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरासह दहा गावांत ११० गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. शहरातील ८२ मंडळांपैकी ७२ मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली असून, उर्वरित मंडळांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अधिकारी, ३० पोलिस, ३० होमगार्ड, तसेच राखीव प्रशिक्षणार्थी पथकातील १० महिला व १० पुरुष पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. संपूर्ण तालुक्यात गणेशोत्सव उत्साहात सुरू असून, भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
---------
या गावांचा समावेश
मोर्वीस, सोनारी, हंडेवाडी, मढी खुर्द, देर्डे चांदवड, खिर्डी गणेश, बोलकी, कासली, शिरसगाव, सावळगाव, घोयगाव, धोत्रे, जवळके, ओगदी व हिंगणी या गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com