सातारारोड पेन ड्राईव्ह मधील माहितीची चौकशी

सातारारोड पेन ड्राईव्ह मधील माहितीची चौकशी

Published on

कोरेगाव पोलिस ठाणे प्रकरण विधानपरिषदेत गाजले

शशिकांत शिंदे यांचे आरोप; पेनड्राइव्हमधील पुराव्यांवर चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांचे सूतोवाच

सातारारोड, ता. ४ : कोरेगाव पोलिस ठाण्यातील निरीक्षकांबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने आपल्याकडील पेनड्राइव्हमधून जी काही माहिती मिळेल, त्यामधील चौकशीत कोणी दोषी आढळल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे उत्तर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावरील उत्तरात आज दिले.
कोरेगाव पोलिस ठाण्यातील निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आमदार शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘मी विचारू इच्छितो, की असा कुठे गृह विभागाने निर्णय घेतला आहे का, की आमच्याकडे आल्यानंतर तुमचा व्यवसाय सुरू करतो, असा राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय आशीर्वाद देण्याचा आपल्या विभागाचा काही उद्देश असेल, तर असे व्यवसाय बंद होणार नाहीत. आपल्या उत्तरातच दिले आहे, की ४७ गुन्हे दाखल झालेले आहेत, याचा अर्थ व्यवसाय सुरू आहेत‌. बेकायदेशीर व्यवसाय करण्यासाठी काही लोकांना सांगितले, की ‘तुम्ही आमच्या पक्षात या, आमच्याकडे या, तुमचे व्यवसाय परत सुरू करतो,’ अशाप्रकारे पक्षात घेऊन पवित्र झालेल्यांचे व्यवसाय परत सुरू झालेले आहेत. त्याबाबतची सर्व माहिती मी पुराव्यासकट नावानिशी देईन, माझ्याकडे पेनड्राइव्ह आहे. मागे कोरेगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा निघाला होता, मारहाण झाल्यानंतर मारहाण झालेल्याला दोन महिने बाहेर जावे लागते आणि ज्याने मारहाण केली तो गावातच राहतोय. कोरेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक बल्लाळ यांनी गांधी जयंतीच्या वेळी ज्यावेळी दारू बंद असते, त्यावेळी कुठे-कुठे सुरू आहे, याची माहिती घेतली आणि तेथे छापा टाकून मग कलेक्शन केले असून, त्यावरील संभाषण आहे. अशाप्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. एक तर तुम्ही सरसकट बंद करा, नाही तर सरसकट सुरू तरी ठेवा. आपल्याकडे कोणी आला, म्हणून जर त्याला सूट देत असाल, तर ते चुकीचे आहे.’’
पोलिस निरीक्षक बल्लाळ यांनी गुन्हे दाखल करताना केलेली पार्सलेटी, अवैध व्यवसाय करण्यासंदर्भातील त्यांची भूमिका, यावर आम्ही पोलिस अधीक्षकांपासून विविध ठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर सरसकट अवैध व्यवसाय बंद करण्याबाबतचा कायदा कडक करणार आहात का? पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणार का? पोलिस निरीक्षक बल्लाळ यांच्याविषयीच्या तक्रारींवर अद्यापही कारवाई केलेली नाही, पेनड्राइव्हमधील संभाषणानुसार अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालून हप्ते गोळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, ‘‘पुसेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ४७ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांतील संशयित निष्पन्न झाले असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयामध्ये दाखल देखील करण्यात आले आहे. आपल्याकडील पेनड्राइव्हमधून जी काही माहिती मिळेल, त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल.’’

चौकट
------
अवैध सावकारी करणाऱ्यांवर फौजदारी
--------------
पुसेगाव येथील एका गरीब कुटुंबाला खासगी सावकारीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याने पुसेगाव येथील एक कुटुंब प्रचंड दबावाखाली आहे. अशाप्रकारे खासगी सावकारीच्या माध्यमातून त्रास देण्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणार का? खासगी फायनान्सवाले तर बाउंसरचा वापर करतात, त्यावर आळा घालणार का? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘लायसन्सवाले खासगी सावकार आणि अवैध सावकारी करणारे सावकार आहेत. अवैध सावकारी करणाऱ्यांनी दिलेली कर्जे तर अवैधच आहेत. त्यांच्याकडून प्रतारित केले जात असेल, तर तशी तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. लायसन्सवाल्या खासगी सावकारांनी नियमापेक्षा जास्त वसुली केली, तर तशी तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, त्यांचे लायसन रद्द करून फौजदारी कारवाई केली जाईल.’’

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com