

‘कोयने’मुळे सिंचन, वीजनिर्मितीला दिलासा
दमदार पावसाने दोन महिन्यांत १०० टीएमसीचा टप्पा; २८.४४ टीएमसी पाणी नदीपात्रात
सूर्यकांत पाटणकर ः सकाळ वृत्तसेवा
पाटण, ता. २६ : महाराष्ट्राच्या वीजनिर्मिती आणि सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणाने ऑगस्टच्या अखेरीस पाणीसाठ्याची शंभरी ओलांडली. धरणातील पाणीसाठ्याने नुकताच १०० टीएमसीचा टप्पा पार केला. जूनअखेर पाणीसाठा खालावल्याने निर्माण झालेली दुष्काळाची चिंता आता दूर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ पोचल्याने राज्याच्या वीजनिर्मितीसह पूर्वेकडील दुष्काळी भागाच्या सिंचनाला दिलासा मिळाला आहे.
धरणातून आतापर्यंत पायथा वीजगृहातून ३.०९ टीएमसी, तर सहा वक्र दरवाजांतून २५.३५ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आतापर्यंत ५.५७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या पश्चिमेकडील वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी मागणी नसल्याने त्या दिशेचा विसर्ग बंद केला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्याचे एक जून ते ३० मे या जलवर्षानुसार नियोजन केले जाते. त्यानुसार धरणातील २९ टीएमसी पाणी पूर्वेकडील सिंचनासाठी, तर ६९ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याचे नियोजन आहे.
यंदाच्या जलवर्षाची सुरुवात कोयनेसाठी चिंताजनक होती. जूनअखेर पाणीसाठा खालावल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिणामी राज्याच्या वीजनिर्मिती आणि सिंचनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मात्र, पाच जुलैनंतर पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. ९ जुलैला धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या सात दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठ्याची विक्रमी वाढ झाली. जुलैमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस झाल्याने जलाशयात येणारी आवक वाढली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून सुरुवातीला १,०५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले. त्यानंतरही आवक वाढल्याने ३० जुलैला धरणाचे दरवाजे उघडून यंदाच्या जलवर्षातील पहिला नदीपात्रात विसर्ग सुरू केला.
धरणातील पाण्याची गणिते
२६ ऑगस्टअखेरचा पाणीसाठा - १००.०६ टीएमसी
पूर्वेकडील सिंचनासाठी नियोजित पाणी - २९ टीएमसी
वीजनिर्मितीसाठी नियोजित पाणी - ६९ टीएमसी
यंदा दरवाजांतून झालेला विसर्ग - २५.३५ टीएमसी
पायथा वीजगृहातून सिंचनासाठी वापर - ३.०९ टीएमसी
पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी वापर - ५.५७ टीएमसी
जुलैमध्ये सात दिवसांत झालेली विक्रमी वाढ - ३३ टीएमसी
.............
चौकट
..............
तर सिंचनाला फायदा...
कोयना धरणातील पाण्याचा वापर करून पश्चिमेकडे वीजनिर्मिती केली जाते. या प्रक्रियेत वापरलेले सुमारे ६७.५ टीएमसी पाणी पुन्हा वापरात येत नाही. हे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा शासनाचा मनोदय प्रत्यक्षात आल्यास सातारा, सांगलीसह दुष्काळी भागातील सिंचनाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे या पाण्याबाबत सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
...............................
A01469
कोयना धरण
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.