

कृष्णेच्या पुराचे पाणी
अक्कलकोटकडे वळवा
आमदार सचिन कल्याणशेट्टींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ॲग्रोवन वृत्तसेवा
अक्कलकोट, जि. सोलापूर ः सांगली शहर व परिसराला दरवर्षी बसणारा पुराचा फटका टाळण्यासाठी कृष्णा नदीतील सुमारे ५० टीएमसी अतिरिक्त पाणी नीरा-भीमा खोऱ्याकडे वळवण्याचे नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रस्तावित योजनेतून अक्कलकोट तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर करावे, अशी आग्रही मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अक्कलकोट तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळप्रवण भाग असल्याने परिसरातील जलसंपदा विभागाचे छोटे-मोठे प्रकल्प दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. यामुळे शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही आणि तालुक्याला सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भीमा नदीवरून उपसा सिंचन योजनेद्वारे पुराचे ५ टीएमसी पाणी उचलून अक्कलकोटमधील अपुऱ्या प्रकल्पांमध्ये सोडावे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जलसंपदा विभागामार्फत भीमा नदीवरून उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण करून तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही आमदार कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याविषयी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, ‘‘अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील सततची पाणीटंचाई आणि दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी कृष्णेच्या पुराचे पाणी नीरा-भीमा खोऱ्यात वळवण्याच्या योजनेतून तालुक्याला हक्काचे पाणी मिळणे भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.