मेघसखा कुडा

मेघसखा कुडा
Published on

देशातुनी फुलांच्या
मेघसखा कुडा
- डॉ. मंदार दातार
----------------------------------
लीड
कुडा लाखो पिढ्यांपासून दरवर्षी डोंगर-उतारांवर फुलत आला आहे. त्याची पांढरी, सुगंधी फुले दर ग्रीष्मात उमलतात आणि पावसाळ्यापर्यंत बहरत राहतात. ती पृथ्वीवरच्या सर्वात भव्य नैसर्गिक घटनांपैकी एका घटनेची म्हणजेच मॉन्सूनची साक्षीदार होतात.
----------------------------------

आपल्या सखीपासून विरह प्राप्त झालेला एक शापित, कृश झालेला यक्ष रामगिरीवर उभा आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला पर्वतशिखरावर एक मेघ दिसतो. चेतना-अचेतनाचे भान पूर्णपणे हरवून बसलेला हा यक्ष त्या उत्तरेला जाणाऱ्या मेघामार्फत हिमालयातील अलका नगरीत वास्तव्यास असणाऱ्या आपल्या भार्येला निरोप पाठवायची कल्पना करतो. ज्याच्या हाती आपला संदेश पाठवायचा आहे, त्या मेघाच्या स्वागतासाठी काय उपहार देता येईल म्हणून यक्ष आसपास बघतो, तर त्याला तिथे दिसतात कुटजाची म्हणजे कुड्याची ताजी सुवासिक फुले. मेघदूताची पार्श्‍वभूमी सांगणाऱ्या महाकवी कालिदासाच्या या श्‍लोकाचा अनुवाद कुसुमाग्रज असा करतात -
गगनपांथ हा नेईल का संदेश वल्लभेप्रत
श्रावणमासी असो सखीचे कुशल असे चिंतीत
कुटजफुलांनी अभिनव त्याला दिधली अर्ध्यांजली
त्या मेघाचे यक्ष पुढे हो करण्याला स्वागत
या एकाच श्‍लोकात कालिदासाच्या कविकल्पनेची जेवढी उंची दिसते, तेवढीच त्याच्या निसर्गाच्या निरीक्षणामागची प्रतिभाही जाणवते. कालिदासाने मेघाचे स्वागत करताना कुडाच का निवडला, तर याचे कारण आहे, कालिदासाचा रामगिरी पर्वत जिथे वसला आहे, त्या मध्य भारताच्या जंगलांत आषाढाच्या तोंडावर हा कुटज नेमका फुललेला असतो.

संस्कृतात ‘कुटज’ नावामागेही एक अर्थ आहे. ‘ज’ म्हणजे जन्मलेला आणि ‘कूट’ म्हणजे डोंगर किंवा टेकडी. मेघदूतातच आम्रकूट नावाचाही एक पर्वत वर्णिलेला आहे. कुडा डोंगर-उतारांवर जन्मलेला आहे. जसा जलज, पंकज तसाच हा कुटज. कुड्याचे शास्त्रीय नाव आहे होलाऱ्हेना प्युबीसीन्स (Holarrhena pubescens). पूर्वी कुडा होलाऱ्हेना अँटिडीसेंटेरिका (Holarrhena antidysenterica) या नावानेही ओळखला जाई. हे जुने नावच कुड्याचा सर्वात महत्त्वाचा गुण सांगते. अँटिडीसेंटेरिका म्हणजे आमांशनाशक. सह्याद्री व मध्य आणि उत्तर भारताच्या पानगळी जंगलांत (आणि आफ्रिकेतही) खडकाळ व उघड्या उतारांवर हा छोटेखानी वृक्ष किंवा झुडूप सहज आढळते. कुड्याच्या बियांना ‘इंद्रजव’ म्हणतात. हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषधद्रव्य आहे. मात्र कुड्याचा खरा खजिना लपला आहे त्याच्या मूळ आणि खोडाच्या सालीत. याच सालीत कोनेसिनसारखी स्टिरॉइडल अल्कलॉइड्स आढळतात. हीच औषधे त्याच्या अतिसार थांबवण्याच्या आणि जंतूंविरुद्धच्या कामगिरीमागचे खरे रहस्य आहे.

भारतभूमीला कुड्याची ही औषधी ओळख कालिदासाच्याही आधीपासूनची आहे. इसवीसनपूर्व पहिल्या-दुसऱ्या शतकातल्या आयुर्वेदातील सर्वात प्राचीन ग्रंथ असलेल्या चरक संहितेत कुटजाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. तोही वमन आणि बस्तीकर्मासाठी उपयुक्त द्रव्य म्हणून. कालिदासाने ज्या फुलांना स्वतःच्या काव्यात अढळ स्थान दिले, त्याच वृक्षाला त्याच्याही आधी वैद्यकशास्त्राने औषधात स्थान दिले होते. आजही ‘कुटजारिष्ट’ या नावाने ओळखले जाणारे कुड्याच्या सालीचे आयुर्वेदिक औषध घरोघरी वापरले जाते. ही वनस्पती औषधात आणि कवितेत दुहेरी भूमिका रंगवत आलेली आहे. आपल्या दोन हजार वर्षांच्या अखंडित परंपरेचे यापेक्षा चांगले उदाहरण नसेल.

मात्र मला कुडा जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा तेव्हा तो चरक-अग्निवेशाच्या कुड्यापेक्षाही कालिदासाचा कुडा म्हणूनच भावतो. त्याला कवितेत आणायचे, तर मेघदूताच्या मंदाक्रांतेहून सुयोग्य वृत्त सापडलेच नसते. मात्र मला तो दिसला सुमंदारमालामध्ये. यक्षाद्वारे निरोप पाठवणाऱ्या दुःखी मंदाक्रांतेपेक्षा ऋतूंचे चक्र, त्यांचे पुनरपि येणारे ‘ऱ्हीदम’ जगत असणारा सुमंदारमालेतला कुडा...
सरी पावसाच्या मृगाशी बरसता, फुले शुभ्र जो कालिदासी कुडा
घनाला पुजाया वनी वाढलेला असा यक्षहाती सुवासी कुडा

अशी साल ज्याची बहूमुल्यधारी, महत्ता जयाची ऋषींच्या मुखी
चरक संहिताही तया मान देई, असा हिंददेशी निवासी कुडा

प्रफुल्ला धरेशी, प्रसन्नाशयाने, रुपेरी फुलांचा सडा घालतो
असा शुभ्रपुष्पी, शशी भासणारा, रवीच्या कुळाचा विभासी कुडा

जिथे पानगळती शिशीरात होई, नवी पालवी ग्रीष्मकाली स्फुरे
तिथे पावसाच्या उभा स्वागताला, सदोदीत आषाढ मासी कुडा

गिरीच्या सुकन्या फुले या कुड्याची, शिरी माळती प्रेमभावे सदा
तया केशसंभार गंधाळणारा सख्यांचा सखा हा विलासी कुडा

कवी कुलगुरू मेघदूतात ज्याला, जरी अग्रश्लोकी मिरवतो तरी
पुढे मेघमार्गा पुरा व्यापणारा, जणू मेघपंथी प्रवासी कुडा

कुडा नेमका आषाढाच्या तोंडावरच का फुलतो, असे कोणीतरी मला पूर्वी विचारले असते, तर याचे एक उत्तर माझ्यापुरते तयार होते. या उत्तराच्या मागे होते पूर्वी कधीतरी वाचनात आलेले एक विचारमत (हायपोथेसिस). वृक्षांच्या हंगामी फुलण्यावर झालेल्या एका संशोधनानुसार, हिवाळ्यात पानगळ झालेल्या झाडांच्या सुप्तावस्थेतल्या फांद्या पावसाच्या पहिल्या सरींच्या पाण्याने पुन्हा भरून जातात आणि या पाण्याच्या माध्यमातून मिळलेल्या संदेशामुळे कळ्या जाग्या होऊन फुलतात. हा जुना अभ्यास कुड्याला चिकटवला अन् मला वाटले, की मेघदूतातील मेघ केवळ प्रतिकात्मक जीवनदाता नाही, तो कुड्याला अक्षरशः ‘भौतिक’रित्या फुलवतो. यक्षाने मेघाला जे काव्यरूपात संबोधले, तेच विज्ञानाने शब्दशः सत्य ठरवले.

पण विज्ञान कधीकधी आपल्या सहजसोप्या कथांना चक्क नाकारते. आठवणीला ताण दिला, पुस्तके पाहिली आणि भटकंती करणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी बोललो तेव्हा लक्षात आले, की कुड्याचा फुलण्याचा काळ प्रत्यक्षात एप्रिल (कधीकधी जानेवारीही) ते जुलै असा नोंदवलेला आहे. हे फुलणे ऐन ग्रीष्मातच पाऊस येण्याआधीच आहे. खरे चित्र अधिक गुंतागुंतीचे आणि खरी कथा अधिक मनोज्ञ आहे.

बनारस हिंदू विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासानुसार, भारतीय पानगळी जंगलांतल्या वृक्षांच्या फुलण्याचे पाच प्रकार आढळतात. काही वृक्ष पावसानंतरच फुलतात, काही हिवाळ्यात जून झालेल्या पानांबरोबर फुलतात, काही हिवाळ्यातच पानगळ झालेल्या उघड्या फांद्यांवर फुलतात, काही ग्रीष्मात कोवळ्या पालवीबरोबर फुलू लागतात, तर काही पावसाळ्यात फुलतात. कुडा या शेवटच्या दोन प्रकारात मोडतो. त्याच्या बहराची सुरुवात सध्या वाढत्या तापमानामुळे ग्रीष्मातच होत आहे. मेघ येण्याची तो वाट पाहतही नाही; आधीच फुलू लागतो. जणू काही तो यक्षासारखाच, पाऊस येण्याआधीच व्याकूळ झालेला आणि आधीपासूनच वाट पाहणारा आहे.

हे वाचून मनात एक रास्त प्रश्‍न येईल. इतक्या टोकाच्या दोन वेगळ्या ऋतूंमध्ये पसरलेले हे फुलणे वनस्पतींमध्ये अपवादात्मक असते का? कारण दोन ऋतूंत फुलणे म्हणजे दोन भिन्न परिस्थितींना सामोरे जाणे. कारण वनस्पतींचे उन्हाळ्यातले आणि पावसाळ्यातले परागवाहक वेगळे. त्यामुळे दोनदा फुलणे म्हणजे ऊर्जेचे गणित कोलमडूनच जाणे आहे. त्यामुळे फारच थोड्या वनस्पती हा धोका पत्करत असतील. पण भारतीय पानगळी जंगलांवरच्या एका अभ्यासाने हाही अंदाज पूर्णपणे उलटा फिरवला. शंभराहून अधिक वृक्षजातींच्या एका अभ्यासात असे आढळले, की कुड्यासारखे ग्रीष्मात सुरू होऊन पावसाळ्यात विस्तारणारे फुलोरे हा अपवाद नाही, तर ही भारतीय पानगळी जंगलांत अगदी सहज घडणारी घटना आहे. इतकेच काय, तर कोस्टा रिका, मेक्सिको आणि बोर्निओच्या शुष्क उष्णकटिबंधीय जंगलांतही असाच पॅटर्न नोंदवला गेला आहे. आणि याचे एक स्पष्ट उत्क्रांतीशास्त्रीय कारणही सांगता येते. मॉन्सूनच्या नेमक्या आगमनाच्या तारखेत दरवर्षी काही आठवड्यांचा फरक पडतो (आता या वर्षीच बघा). जर एखाद्या वनस्पतीने केवळ पावसानंतरच फुलण्याची सवय अंगी बाणवली असेल आणि पाऊस उशिरा आला, तर त्यावर्षी तिच्या फुलोऱ्याच्या विस्ताराचा काळ कमी होऊ शकतो. यापेक्षा ग्रीष्मातच सुरुवात करून पावसाळ्यात फुलत राहायची रणनीती हे हवामानाच्या अनिश्‍चिततेविरुद्धचे एक संरक्षण आहे, एक प्रकारचा ‘विमा’ आहे. लवकर सुरुवात करणाऱ्या वृक्षांना फळ-बीज पूर्ण विकसित होण्यासाठी जरा जास्तीचा काळही मिळतो आणि झाडांना त्याचा फायदाही होतो. यात परत कुड्याचे परागवाहक असणारे मधमाश्या आणि भुंगे हे दोन्ही प्रकारचे कीटक ग्रीष्म आणि वर्षा या दोन्ही ऋतूंत तितकेच सक्रिय असतात. त्यामुळे हे असे दोन ऋतूंत फुलणे कुड्याला चालून जाते.

कुडा लाखो पिढ्यांपासून दरवर्षी डोंगर-उतारांवर फुलत आला आहे. त्याची पांढरी, सुगंधी फुले दर ग्रीष्मात उमलतात आणि पावसाळ्यापर्यंत बहरत राहतात. ती पृथ्वीवरच्या सर्वात भव्य नैसर्गिक घटनांपैकी एका घटनेची म्हणजेच मॉन्सूनची साक्षीदार होतात. तब्बल दीड हजार वर्षांपूर्वी कालिदासाने आषाढाच्या तोंडावर मेघ दिसण्याआधीच फुललेले एक फुल जोखले आणि ते आपल्या कथानायक यक्षाच्या हातात दिले. ते होते दोन ऋतूंच्या संधीकाळात फुलणारे, शेकडो पिढ्यांपासून मॉन्सूनच्या आगमनाची वाट पाहणारे कुड्याचे फूल. कुडा आणि मेघाचे नाते त्यामुळेच इतके घट्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com