‘कुकडी’तून बळिराजाला दिलासा

‘कुकडी’तून बळिराजाला दिलासा
Published on: 

नारायणगाव, ता. २७ : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात ५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २७) मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कुकडी डावा कालव्यात ३५ दिवसांत सुमारे ४.३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. तर, पिंपळगाव जोगे, डिंभे उजवा, घोड शाखा, मीना पूरक आदी कालव्यांत गरजेनुसार २.९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनात एकूण ७.२ टीएमसी पाणी वापर होणार आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत सात तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
कुकडी प्रकल्पाअंतर्गत रब्बी हंगाम आवर्तन नियोजनासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक झाली. या वेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, कुकडी सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह कुकडीच्या लाभ क्षेत्रातील पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘कुकडी प्रकल्पातील धरणांत आजअखेर २७.८८ टीएमसी (९३.९६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पात या वर्षी समाधानकारक पाणी साठा झाला असला, तरी कुकडी प्रकल्पातील धरणांच्या लाभ क्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे २५० किलोमीटर लांबीच्या कुकडी डावा कालव्यात ५ नोव्हेंबरपासून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. ३५ दिवसांच्या या आवर्तनात ४.३ टीएमसी पाणी वापर होणार आहे. या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना कृषी सिंचन व बिगर सिंचनासाठी होणार आहे. हे आवर्तन पूर्ण करण्यासाठी माणिकडोह धरण व डिंभे धरणातील पाणी येडगाव धरणात सोडण्याचे नियोजन आहे. जुन्नर, पारनेर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांना जोडणाऱ्या इतर कालव्यात गरजेनुसार २.९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्यात होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुढील आवर्तनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.’’

कुकुडी प्रकल्पातील धरणनिहाय आजअखेरचा उपयुक्त पाणी साठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव :  १.८८ टीएमसी (९६.७८ टक्के), माणिकडोह : ९.१७ टीएमसी (९०.१५ टक्के),  वडज : १.०९ टीएमसी (९५.३९ टक्के), पिंपळगाव जोगे :  ३.४१ टीएमसी (८७.८४ टक्के), डिंभे : १२.३१ टीएमसी (९८.५३४ टक्के), चिल्हेवाडी : ०.७६८ टीएमसी (९५.७५ टक्के).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com