

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २१ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा आरंभ येत्या ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजवंदन सोहळ्याद्वारे होत असून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन दिले. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि अधिकारी-पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपतींना ध्वजवंदन सोहळ्याचे निमंत्रण देतानाच राज्याच्या आध्यात्मिक परंपरेपासून आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषी समृद्धी आणि खाद्य संस्कृतीपर्यंतच्या वैविध्यपूर्ण वारशांची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही प्रदान करण्यात आला. ध्वजवंदनाच्या दिवशी होणाऱ्या गोदाआरती, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित कॉफीटेबल बुक आणि कुंभमेळा टपाल तिकिटाच्या अनावरणासाठी राष्ट्रपती मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त न्या. विवेक सोनुणे, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी यांचा समावेश होता.
निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण
राष्ट्रपतींना सादर करण्यात आलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक माहात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीची महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
भेटवस्तूंमध्ये स्थानिक उत्पादने
आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचा राष्ट्रपतींना दिलेल्या भेटवस्तू संचात समावेश आहे. अगरबत्ती, भरड धान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूच्या वस्तू, वनमध अशा विविध उत्पादनांतून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य समोर येते. आदिवासी कारागिरांचे कौशल्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न आणि समुदायांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या येवला येथील पैठणीचा संचात समावेश आहे. नाशिकच्या कृषीसमृद्धीचे प्रतिनिधीत्व काळ्या मनुका आणि काजू या उत्पादनांद्वारे करण्यात आले आहे. खाद्यपरंपरेचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.