

KRU26B02660
कुर्डू (ता. माढा) : येथे सोमवारी रात्री एसटी बस अचानक बंद पडल्याने दुसऱ्या बसची वाट पाहताना वैतागलेले प्रवासी.
---
स्वारगेटकडे जाणारी एसटी कुर्डूजवळ बंद
रात्रीच्या वेळी महिला, वृद्ध, लहान मुलांचे हाल; एसटी महामंडळाचा निष्काळजीपणा
गणेश भोगे : सकाळ वृत्तसेवा
कुर्डू, ता. २३ : बार्शी डेपोची बार्शी- स्वारगेट ही एसटी बस (एमएच १४ बीटी ४३३७) सोमवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास कुर्डूजवळील संकेत मंगल कार्यालयाजवळ अचानक बंद पडली. यामुळे ३० ते ३५ प्रवाशांना तब्बल तासभर महामार्गावर अडकून पडावे लागले. बसमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांची संख्या मोठी होती. निर्जन परिसरात बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पर्यायी व्यवस्था उशिरा झाल्याने एसटी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
बार्शीहून स्वारगेटकडे निघालेली बस ऐन प्रवासात अचानक बंद पडली. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. रात्रीची वेळ आणि आजूबाजूला अंधार असल्याने प्रवाशांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. बस बंद पडल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही, मात्र तांत्रिक बिघाड किंवा देखभाल- दुरुस्तीतील त्रुटीमुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बस बंद पडल्यानंतर प्रवाशांना जवळपास एक तास रस्त्याच्या कडेला थांबावे लागले. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या बसमध्ये दाटीवाटीने उभे राहून प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. गाडी नादुरुस्त झाल्यानंतरही प्रशासनाकडून तत्काळ मदत किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध न झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एसटी महामंडळाने बस गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
---
कोट
एसटी महामंडळाचा कारभार प्रवाशांच्या जिवावर उठणारा ठरत आहे. मी मुलगी आणि लहान नातवासोबत पुण्याला निघालो होतो. मात्र तासभर रस्त्यावर अडकून पडलो. नादुरुस्त गाडी रस्त्यावर काढून प्रवाशांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार आहे. लहान मुलांचे पाणी आणि अन्नाविना हाल होत असताना प्रशासनाकडून कोणतीही तत्काळ मदत मिळाली नाही.
- हैदर काझी, प्रवासी
---
कोट
आम्ही महिला बसचा प्रवास सुरक्षित म्हणून प्रवासाला निघालोय. मात्र, रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी बस बंद पडली. परिसरात घनदाट अंधार होता. अशा परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? एसटी प्रशासनाने गाड्या रस्त्यावर सोडण्यापूर्वी त्यांची योग्य तपासणी करायला हवी.
- राधा जाधव, प्रवासी
---
कोट
बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, दुसरी एक ब्रेकडाउन झालेली गाडी आणण्यासाठी टोइंग ट्रक आधीच पाठवला गेला आहे. कुर्डू आणि आसपासच्या रस्त्यावर अडकलेल्या महिला व इतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंट्रोलरशी त्वरित संपर्क साधला. या मार्गावरून जाणाऱ्या इतर सर्व बसना संबंधित ठिकाणी थांबवून प्रवाशांना सोबत घेऊन जाण्याचे निर्देश दिले. चालकाने आपल्याला आधी थेट संपर्क केला नव्हता, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी इतर गाड्या थांबवण्याची व्यवस्था तत्काळ केली आहे.
- रत्नाकर लाड, डेपो व्यवस्थापक, कुर्डुवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.