

कुर्डुवाडीतील दिवाणी न्यायालयाला
विधी व न्याय विभागाची मंजुरी
एका न्यायाधीशांसह १६ जणांची असणार टीम
सोलापूर, ता. ६ : कुर्डूवाडी व माढा परिसरातील नागरिकांसाठी आता दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग) स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने अंतिम मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय काढण्यात आला आहे. या न्यायालयात एक दिवाणी न्यायाधीश असणार आहेत.
दिवाणी न्यायालयाअभावी कुर्डुवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांना व पक्षकारांना न्यायासाठी वारंवार माढा, सोलापूर येथे जावे लागायचे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नियम आणि मानकांनुसार ज्या ठिकाणी किमान ५०० प्रलंबित खटले असतात, तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असतात, तेथे दिवाणी न्यायालय सुरू करता येते. याच नियमाचा आधार घेऊन उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने कुर्डूवाडी येथे न्यायालय सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. त्याला मंत्रिमंडळानेही २८ जुलै रोजी मान्यता दिली होती. त्याचा शासन आदेश बुधवारी (ता. ५) निघाला. त्यानुसार दिवाणी न्यायाधीश एक, सहायक अधीक्षक एक, लघुलेखक एक, वरिष्ठ लिपिक दोन, कनिष्ठ लिपिक चार, बेलिफ तीन अशी पदे भरली जाणार आहेत. याशिवाय दोन शिपाई, एक पहारेकरी, एक सफाईगार अशी चार पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जातील, असेही शासन आदेशात नमूद आहे. पदांना मंजुरी मिळाल्याने आता काही दिवसांत न्यायालयाची सुरवात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.