केळघर गट वार्तपत्र
कुसुंबी गटात भाजप विरुद्ध सर्व
शिवेंद्रराजे, शंभूराज देसाईंची प्रतिष्ठा पणाला; रांजणे-ओंबळे यांच्यात हायव्होल्टेज लढत
संदीप गाडवे : सकाळ वृत्तसेवा
केलघर, ता. १ : जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, जावळी तालुक्यातील कुसुंबी गटात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राज्याच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र असले, तरी कुसुंबी गटात मात्र या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. भाजपच्या उमेदवार अर्चना ज्ञानदेव रांजणे आणि शिवसेनेच्या कविता एकनाथ ओंबळे यांच्यात होणारी ही ‘दुरंगी’ लढत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे.
ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील नसून ती दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. भाजप उमेदवार अर्चना रांजणे यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भक्कम पाठबळ आहे, तर कविता ओंबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ताकद लावली आहे. विशेष म्हणजे, केळघरमधील मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेने शिवसैनिकांमध्ये चैतन्य भरले आहे. दुसरीकडे, भाजपला रोखण्यासाठी शिवसेना (शिंदे गट), उबाठा आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्याने ‘भाजप विरुद्ध सर्व’ असे चित्र पाहायला मिळत आहे.
कुसुंबी गटांतर्गत येणाऱ्या दोन पंचायत समिती गणांमध्येही काट्याची टक्कर आहे. आंबेघर गणात भाजपचे विजय सपकाळ आणि शिवसेनेचे आतिष कदम या दोन जवळच्या नातेवाइकांतच लढत होत आहे. भाजपमधील १२ इच्छुकांची समजूत काढण्यात शिवेंद्रसिंहराजेंना यश आले असले, तरी सर्वांना एकसंध ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. कुसुंबी गणात भाजपच्या पुष्पा चिकणे आणि शिवसेनेच्या सुनीता दुंदळे यांच्यात थेट सामना होत आहे. २०१७ मध्ये अर्चना रांजणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळी एकनाथ ओंबळे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तगडे आव्हान उभे केले आहे. ३८ गावांचा समावेश असलेल्या या गटात ‘भाईंचे समर्थक’ बाजी मारणार की ‘बाबाराजेंचे समर्थक’ विजयाचा गुलाल उधळणार, याचा फैसला सात फेब्रुवारीला होणार आहे.
चौकट
मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
निवडणुकीच्या धामधुमीत कुसुंबी गटातील अनेक प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आले आहेत. विजयी होणाऱ्या उमेदवाराला खालील आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ५४ गावांच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावणे, केळघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारणे आणि कास-बामणोली परिसरातील पर्यटनाला चालना देणे, मुंबई-पुण्याकडे होणारे युवकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी ग्रामीण भागात शाश्वत रोजगार निर्मिती करणे, कोयना जलाशयातील सावरी, दरे आणि आपटी-तापोळा पुलांची कामे पूर्ण करणे, कुसुंबी देवस्थानला ‘अ’ दर्जा मिळवून देणे.
फोटो
एकनाथ शिंदे
शिवेंद्रसिंहराजे
कविता ओंबळे
अर्चना रांजणे
KEL26A01352 KEL26A01353
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

