सत्तेसाठी राज्यात दोस्ती आणि मंगळवेढात कुस्ती अशा या अतिशय प्रतिष्ठेच्या लढाईत झालेल्या मतविभागणीमुळे भाजप विजयी

सत्तेसाठी राज्यात दोस्ती आणि मंगळवेढात कुस्ती अशा या अतिशय प्रतिष्ठेच्या लढाईत झालेल्या मतविभागणीमुळे भाजप विजयी

Published on

लोगो ः लक्ष्मी दहिवडी जि. प. गट

मतविभागणीमुळे भाजपचा विजय झाला सोपा
राज्यात दोस्ती अन्‌ मंगळवेढ्यात कुस्ती; प्रतिष्ठेच्या लढाईत शिवशरण यांची बाजी

हुकूम मुलाणी ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १२ ः अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या लक्ष्मी दहिवडी गटाची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांत झाली. सत्तेसाठी राज्यात दोस्ती आणि मंगळवेढ्यात कुस्ती अशा, या अतिशय प्रतिष्ठेच्या लढाईत झालेल्या मतविभागणीमुळे भाजपच्या करुणा शिवशरण या आमदार समाधान आवताडे यांच्या संघटन कौशल्यावर विजयापर्यंत पोचल्या.
या जिल्हा परिषद गटात उमेदवार निश्चिती करण्यास विरोधकांना उशीर झाला. शिवाय विरोधकांत योग्य समन्वय नसल्यामुळे आमदार आवताडे यांनी ही निवडणूक आपली समजून करुणा शिवशरण यांना मोठ्या ताकदीने अगोदरपासून आखाड्यात उतरवले. त्यांचा विजय सोपा करण्याच्या दृष्टीने त्यांनी चोखामेळानगर गणातील संगीता लेंडवे यांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळविले. त्यांनी या मतदारसंघात प्रचारादरम्यान त्या १० हजारापेक्षा अधिक मतांनी विजयी होतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. त्या दृष्टीने प्रचार यंत्रणा देखील कामाला लावली. त्या गटातील लढत आमदार आवताडे विरुद्ध अॅड. कोमल ढोबळे, अशी निर्माण झाली होती. त्यामध्ये काँग्रेसच्या कविता खडतरे यांनीदेखील आव्हान दिले. अशा परिस्थितीत या गटात निर्माण झालेल्या लोकांच्या भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नावर ॲड. कोमल ढोबळे यांनी रान उठवले. तर आमदार आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजना, केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेमुळे निधी सहज मिळणार असल्यास सांगत प्रचार यंत्रणा हाताळली. अशा परिस्थितीत करुणा शिवशरण यांनी ४८३७ मतांनी विजय मिळवला. शिवशरण यांना १२ हजार ६७० इतकी मते मिळाली. तर अॅड. कोमल ढोबळे यांना ७९०३ इतकी तर काँग्रेसच्या कविता खडतरे यांना ५५४६ इतकी मते मिळाली. भाजप विरोधकांच्या मताची बेरीज करता ही विजयी उमेदवारापेक्षा अधिक आहे. त्यामुळे या गटातील भाजपच्या विजयामध्ये मत विभागणीचा फायदा झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच, संगीता लेंडवे यांनी पाठिंबा देऊन प्रचार न करता मिळवलेली ३२६२ मते देखील विचार करण्यासारखी ठरली आहेत.
चोखामेळानगर गणातून दीपाली ताड ५६२५ मतांनी विजयी झाल्या. हा विजय सर्वाधिक मताचा ठरला आहे. कोमल ढोबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतानादेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी रामेश्वर मासाळ प्रचारात दिसून आले नाहीत. त्यामुळे भाजप विरोधी आघाडीत समन्वय नसल्याचे दिसून आले. लक्ष्मी दहिवडी गणात मारापूरचे विनायक यादव हे विजयी झाले. मात्र, त्यांच्या विरोधात नवोदित काकासाहेब मोरे यांनी दिलेली लढत तुल्यबळ ठरली. याच गणातील शिवसेनेचे उमेदवार आबा लांडे यांना ३४० मते मिळाले. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे अपेक्षित मते न मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली
-----
भाजपच्या प्रचारात अनेक सरपंच, नेत्यांचा भरणा
या गटातील प्रचारादरम्यान या गटातील अनेक गावचे सरपंच, प्रमुख नेते हे भाजपबरोबर होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांकडे नेत्यांचा भरणा नव्हता. थेट उमेदवारांनी जनाधार मागितला. कोमल ढोबळे यांच्यासाठी अखेरच्या सभेत नगराध्यक्ष प्रणिता भालके, भगीरथ भालके व आमदार अभिजित पाटील यांनी मोबाईलवर सभा घेतली. तर कविता खडतरे यांच्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार व खासदार प्रणिती शिंदे यांनी सभा घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com