आठ अ उताऱ्यावर आता पोटखराबा नोंद

महेंद्र शिंदे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

खेड-शिवापूर - सातबारा उताऱ्याप्रमाणेच आठ अ उताऱ्यावरही जमिनीच्या पोटखराबा क्षेत्राची नोंद करता येणार आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आठ अ उताऱ्यात सुधारणा करून त्यात पोटखराबा क्षेत्राचा समावेश करण्याचे सूचित केले आहे. 

खेड-शिवापूर - सातबारा उताऱ्याप्रमाणेच आठ अ उताऱ्यावरही जमिनीच्या पोटखराबा क्षेत्राची नोंद करता येणार आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आठ अ उताऱ्यात सुधारणा करून त्यात पोटखराबा क्षेत्राचा समावेश करण्याचे सूचित केले आहे. 

सातबारा उताऱ्यावर लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब्याचे क्षेत्र आणि एकूण क्षेत्र यांचा समावेश असतो. तर आठ अ उताऱ्यात केवळ लागवडीयोग्य क्षेत्राचा समावेश करता यायचा. आठ अ उताऱ्यावरील जमिनीचे क्षेत्र आणि सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र यात तफावत दिसायची. अनेक जणांचे लागवडीयोग्य क्षेत्रापेक्षा पोटखराब्याचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे अनेकदा जमिनीवर कर्ज घेताना किंवा इतर काही प्रकरणे करताना त्या पोटखराबा क्षेत्राचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. सातबारा आणि आठ अ या दोन्ही उताऱ्यांवरील क्षेत्रांची आकडेवारी जुळविण्याची आवश्‍यकता असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

प्रत्येक तलाठी सजात गाव नमुना आठ अ उतारे सुधारित नमुन्यात ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी, तसेच सातबारा संगणक प्रक्रियेमध्ये नमुन्यानुसार आवश्‍यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, अशा सूचनाही महसूल विभागास देण्यात आल्या आहेत.

पोटखराब्यावर आकारणी नाही
आठ अ उताऱ्यात स्तंभ क्रमांक - ३ क्षेत्र या स्तंभात (३ अ) लागवडीयोग्य क्षेत्र, (३ ब) पोटखराबा क्षेत्र (लागवडीयोग्य नसलेले) आणि (३क) एकूण क्षेत्र असे तीन उपस्तंभ करून त्यात पोटखराबा क्षेत्राचा समावेश करण्यात यावा, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच रकाना (३अ) मधील लागवडीयोग्य क्षेत्रच आकारणीस पात्र राहील. तर पोटखराबा क्षेत्रावर आकारणी लागू असणार नाही. 

Web Title: land 8 A Utara Potkharaba registration