

सासवड, ता. २ : जमिनीच्या वडिलोपार्जित हिस्स्याच्या सुनावणीचा आदेश देण्यासाठी आणि तो तहसीलदार यांच्याकडून काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील खासगी व्यक्ती तथा क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सासवड येथील रोहित हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा कारवाईनंतर आरोपी हा शासकीय कर्मचारी नसून खासगी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.
विजय मल्हारी खळदकर (वय ५७, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर) असे लाच घेताना पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ४७ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या असमान हिश्श्यासंदर्भातील सुनावणी तहसीलदार पुरंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. २४ जून २०२६ला प्रकरण बंद करण्यात आले होते; परंतु त्याबाबतचा अंतिम आदेश मिळालेला नव्हता. या आदेशाबाबत विचारपूस करण्यासाठी तक्रारदार शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) तहसील कार्यालयात गेले असता, क्लार्क खळदकरने तहसीलदार यांच्याकडून आदेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर बुधवारी (ता. २) एसीबी पथकाने केलेल्या पडताळणी दरम्यान खळदकरने ही मागणी वाढवून २५ हजार रुपयांवर नेल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुण्याच्या पथकाने बुधवारी सापळा रचून खळदकरला सासवडमधील रोहित हॉटेलसमोर तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील, उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे, अंमलदार बाळासाहेब गदादे, दीपक काकडे आणि रवी दिवेकर यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.