कात्रज येथे दरड कोसळली, दुर्घटना टळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katraj Landslide

पुणे शहराच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना आज (ता. ६) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कात्रज घाटामध्ये दरड कोसळली.

कात्रज येथे दरड कोसळली, दुर्घटना टळली

पुणे - शहराच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना आज (ता. ६) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कात्रज घाटामध्ये दरड कोसळली. डोंगरावरून तीन ते चार मोठे दगड खाली रस्त्यावर आले. सुदैवाने यामध्ये कोणताही अपघात झाला नाही. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली.

गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहराच्या परिसरात डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने तसेच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क आहेत.

बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पीएमपीची कोंढणपूरच्या दिशेने जाणारी बस कात्रज बोगद्यापासून सुमारे १०० मीटर लांब असताना अचानकपणे डोंगरावरून मोठेच्या मोठे दगड घसरत रस्त्यावर आले. पीएमपी चालक अमर चव्हाण यांनी हे दगड पाहताच याची माहिती त्वरित महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. त्यानंतर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनचे पथकाने कात्रज घाटाकडे धाव घेतली. कात्रज बोगद्याच्या अलीकडे मोठे दगड रस्त्यावर होते. तेथे बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर जेसीबी व घरपाडी विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन रात्री हा राडाराडो बाजूला करण्याचे काम सुरू केले. यावेळी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय वाघमोडे, आरोग्य निरीक्षक धनराज नवले उपस्थित होते.

विजय वाघमोडे म्हणाले, कात्रज घाटात दरड पडल्याची माहिती पीएमपी चालकाकडून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. त्यानंतर आमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने इथे धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने दगड बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.

Web Title: Landslide In Katraj Accident Was Averted Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..