घरगुती सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

दरवाढीमागची कारणे 

 • डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण.
 • आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात झालेली वाढ. 
 • गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडरचे दर हे 703 रुपये होते. ते आता 849 वर गेले असून ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार
 • भारत, इंडेन, एचपीसह खासगी कंपन्यांची मिळून पुणे-मुंबईतील सिलिंडर ग्राहकांची संख्या - 11 कोटी

दरवाढ बुधवारपासूनच लागू; ‘व्यावसायिक’च्या दरात २२६ रुपयांची वाढ
पुणे - महागाईच्या भडक्‍यात सर्वसामान्य होरपळून निघत असताना त्यात आता गॅस कंपन्यांनी सिलिंडरच्या दरवाढीचे तेल ओतले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १४६ रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २२६ रुपयांची वाढ या कंपन्यांकडून करण्यात आली आहे. ही दरवाढ बुधवारपासून (ता. १२) लागू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या दरवाढीमुळे घरगुती सिलिंडर आता ८४९ रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरसाठी एक हजार ४६१ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ असून, साडेतीन महिन्यांत घरगुती सिलिंडरच्या दरात १७८ रुपये ५० पैसे, तर व्यावसायिक सिलिंडरमध्ये २६४ रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ एक फेब्रुवारीपासून लागू होणार होती. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे सरकारकडून घरगुती सिलिंडरची दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरातील वाढ एक फेब्रुवारीपासूनच लागू केली आहे. दिल्ली विधानसभा निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून (बुधवार) घरगुती सिलिंडरच्या दरातील वाढ लागू करण्यात आली.

सिलिंडरच्या दरावरील निर्बंध केंद्राकडून यापूर्वीच उठविण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात होणाऱ्या चढ-उतारानुसार दर महिन्याला सिलिंडरचे बेसिक दर निश्‍चित होतात. त्यावर अन्य कर लागू करून सिलिंडरचे दर निश्‍चित केले जातात.

  घरगुती गॅससाठीचे अंशदान (सबसिडी)
  जानेवारी २०२० - १४७ रुपये ३८ पैसे
  १ ते ११ फेब्रुवारी २०२० - १४३ रुपये ३८ पैसे
  १२ फेब्रुवारीपासून - २७० ते २८० (अंदाजे)


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Large increase in domestic cylinder rates

  टॅग्स
  टॉपिकस
  Topic Tags: