शेतकऱ्यांच्या विरोधामुळे खेडमध्ये प्रचंड बंदोबस्त

रुपेश बुट्टे
Friday, 14 August 2020

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणावरून पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम आजपासून (ता. १४) प्रचंड पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले आहे.

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणावरून पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम आजपासून (ता. १४) प्रचंड पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले आहे. हे काम सुरू करण्याला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे, तर दुसरीकडे गावपातळीवर जाऊन प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जमीन मोबदला देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

भामा आसखेड धरणावरून पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येत असून, किरकोळ अपवाद वगळता या जलवाहिनीचे एक किलोमीटरचे काम आसखेड खुर्द गावच्या परिसरात सर्वानुमते बाकी ठेवण्यात आले होते. परंतु, कालपासून अचानक प्रशासनाने सूत्रे हलवून हे काम सुरू करण्यासाठी हालचाली केल्या. त्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. प्रश्न प्रलंबित असल्याने काम बाकी ठेवायचे, असे ठरले असताना देखील पोलिस बळाचा वापर करून शासन जी दडपशाही करीत आहे, याचा प्रकल्पग्रस्तांनी निषेध केला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजच्या पोलिस बंदोबस्तासाठी एक पोलिस निरीक्षक, १६ अधिकारी,राज्य राखीव पोलिस दलाचे १०० कर्मचारी, आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७५ कर्मचारी उपस्थित होते. तर, दुसरीकडे आर्थिक स्वरूपात मोबदला देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पाईट, शिवे, अहिरे, पाळू, आंबोली, वहागाव आणि करंजविहिरे या सजाच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत पथक तयार करून गावपातळीवर शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, आम्हाला जर आर्थिक मोबदला घ्यायचा असता, तर आम्ही तीस वर्षे न्यायालयात आणि रस्त्यावर लढा कशाला दिला असता, असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large police contingent in Bhama Askhade area