पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाने असा घातलाय हाहाकार 

manchar rain
manchar rain

पुणे : निसर्ग चक्रीवादळाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी शाळा व घरांचे पत्रे उडाले. ठिकठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतून विस्कळीत झाली. विजेचे खांब वाकणे व तारा तुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्याचा मोठा भाग बराच काळ अंधारात राहिला. 

हवेली तालुका
लोणी काळभोर :
उरुळी कांचन, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, मांजरी बुद्रुक, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत मागील चोवीस तासापासुन सोसाट्याचा वारा आणि पावसाने धुडगूस घातला आहे. पूर्व हवेलीमधील इतर गावांच्या तुलनेत लोणी काळभोर व आळंदी म्हातोबाची, मांजरी बुद्रुक या तीन गावात मागिल चोवीस तासात मोठा पाऊस झाला आहे. लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाचीसह पूर्व हवेलीत मंगळवारी सायंकाळी चारपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. पाऊस होण्यापूर्वी वारे मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने काही ठिकाणी झाडेही पडली. वादळामुळे विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे संपूर्ण पूर्व हवेलीत मागील चोवीस तासांपासून वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे इमारतीमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

खेड शिवापूर  : परिसरातील वेळू आणि शिवरे गावात दोन ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले. तर पुणे-सातारा
रस्त्यावरील अनेक छोट्या टपऱ्या या वादळाने उलटल्या. वादळ आणि पाऊस लक्षात घेता नागरीकांनी आज घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावरही आज तुरळक वाहने दिसत होती.
 

मुळशी तालुका                                        पिरंगुट  : पिरंगुट परिसरात आज वादळी वारे व पावसाने धुमाकूळ घातला असून, मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळले असून, तारा तुटल्या आहेत. अनेक घरावरील पत्रे उडून गेले असून संसार उघड्यावर आले आहेत. पिरंगुट  येथील पवळेआळीतील विजय पवळे, लक्ष्मीनगरमधील तपकीर वखार, सम्राट अशोकनगरमधील राकेश खंडागळे व मतेवाडी येथील लक्ष्मण भगत यांच्या घरावरील  सगळे पत्रे  उडाले आहेत. मुठा खोऱ्यातील  कोंढूर येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे सर्व पत्रे उडाले आहेत. लवळे, पिरंगुट, कासार आंबोली, नांदे, उरवडे, मुठा, कोळावडे, लव्हार्डे, भोडे, वांजळे आदी परिसरातील रायवाळ व हापूस आंब्याची फळे गळून पडली आहेत. या भागातील अनेक घरावरील पत्रे उडाले आहेत. पिरंगुट येथील नाल्को वाॅटर कंपनी व टेक निव्हा कंपनीसमोरील झाडे कोसळली आहेत. लवळे गावातील सर्वात उंच व सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे जुने येळ्याचे (बेहडा) झाड पडले. घोटावडे फाटा येथील स्टेट बँकेसमोर असलेले झाड कोसळले. पिरांगुट येथील हायस्कूलसमोरील व स्मशान भूमी रस्त्यावरील विजेचे खांब कोसळले. कासार आंबोली येथील शिंदेवाडी येथे निलगिरी चे झाड कोसळल्याने विजेचा खांब व तारा तुटल्या आहेत. लवळे येथील पॉली हाउसचे नुकसान झाले आहे. भेंडी, कोथिंबीर, दोडका, कारले आदी पिकांनाही फटका बसला आहे. पिरंगुट येथील सन शाईन  सोसायटीत झाडे पडून गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, सौर उर्जाचे पॅनल फुटले आहेत.
पौड : कोकणच्या सिमेवर असलेल्या मुळशी तालुक्याला चक्रीवादळाचा फटका बसला. मुळशी धरण परिसरातील बार्पे तिस्करी येथील सुमारे बारा घरांची छप्पर वाऱ्याने उडाले व भिंतीही कोसळल्या. विविध गावांतील घरांचेही आतोनात नुकसान झाले. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने मुळशीकरांची अक्षरशः दाणादाण उडाली. कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यात झाडे उन्मळून पडली. अनेक गावांधील वीजेचे खांबही पडले. संपर्कयंत्रणाही कोलमडली. मंगळवारपासूनच मुळशी धरण भागात सोसाट्याच्या वाऱ्याला सुरूवात झाली होती.तर पहाटेपासून वारा आणि पावसाने धुमाकूळ घालायला सुरूवात केली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने दुपाऱच्या सुमारास बार्पे- तिस्करी येथील भरत वाशिवले, अनंता वाशिवले, राम  खरूसे, विष्णू खरूसे, हरी खेडेकर, भिका वाशिवले, दत्ता वाशिवले, गणपत वाशिवले, नवनाथ वाशिवले, विष्णू वाशिवले, लहू वाशिवले, बबन ओव्हाळ, सुरेश पाठारे, भीम पाठारे, विजय ओव्हाळ, प्रकाश ओव्हाळ यांच्या घरांचे पत्रे उडून गेले. त्याचप्रमाणे भिंतींनाही चिरा गेल्या. अचानक छप्पर उडून गेल्याने सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी येथील ग्रामस्थांची धावपळ झाली. मंदिरात आसरा घेतला. काहीजण इतरांच्या घरी निवाऱ्याला गेले. वाघवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत, भादसखोंडा, वांद्रे याठिकाणी घरांची पडझड झाली. मुळशी धरणासह माले, कोळवण, रिहे, मुठा, मोसे खोऱ्यातील विविधा गावांतील घरांच्या मोठ्या प्रमाणात पडझडी झाल्या. विविध मुख्य रस्त्यावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक गावांतील वीजेचे खांबही कोलमडले. त्यामुळे ताराही जमीनीवर पडल्या. त्यामुळे हा संपूर्ण भाग सध्या अंधारात आहे. रस्त्याकडील, खाचराच्या बांधावरील झाडेही पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातही वादळाचा फटका बसला. वाळेण व डोंगरगाव येथे सुमारे सहा घरांचे व शाळांचे पत्रे उडाले. तसेच, एकूण आठ एकर पाॅलीहाउसचे नुकसान झाले.   

खेड तालुका                                     राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज  दुपारनंतर 'निसर्ग' चक्रीवादळाने थैमान घातले. तुफानी वादळी वाऱ्यांनी ठिकठिकाणी झाडे पडली आणि अनेक ठिकाणी शेडचे आणि कच्च्या घरांचे, खोल्यांचे पत्रे उडाले. ठिकठिकाणी विजेचे खांब पडले. जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. वीजपुरवठा कित्येक तास बंदच राहिला. 
राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी रस्त्यावर भाडेकरू राहत असलेल्या आठ खोल्यांचे पत्र्याचे छप्पर उडाले. शिरोली- पाईट रस्त्यावर झाड पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. मात्र, सार्वजनिक बांधकाम खाते व शिरोली ग्रामपंचायतीने जेसीबी लावून झाड बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीला सुरू केला. भाम येथे पत्र्याचे शेड अँगलसह उखडून पुणे नाशिक महामार्गावर आले. वांजळे या गावाजवळच्या रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळले. खरोशी येथील शाळेचे पत्रे, पराळे आणि देवतोरणे येथील अंगणवाडीचे, मांजरेवाडी येथे शाळेचे, वाड्याच्या ढगाळवाडी येथील अंगणवाडीचे, भीमाशंकर येथील महादेव गार्डनचे, तर आंबोली येथे दोन घरांचे पत्रे उडाले. वहागाव येथे एक घर पडले. त्यात
४ जखमी झाले. जखमींना चाकण येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यात एक ज्येष्ठ महिला गंभीर आहे. चाकण : चाकण व परिसरात काल  रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने व जोराच्या वाऱ्याने काहींचे पत्रा शेड व
जनावरांचे गोठे पडले आहेत. घरावरील पत्रे उडून गेले आहेत. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.
वादळाने चाकण व परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. शहरातील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ ही कमी होती.बहुतांश लोकांनी घरी राहणे पसंत केले.
आंबेठाण : खेड तालुक्यात वहागाव येथे वादळी वाऱ्यात घर पडले असून, त्यात एक महिला ठार झाली आहे तर
तीन जखमी असून एक जण गंभीर जखमी आहे.
पाईट : पाळू गावातील पांडुरंग नारायण गायकवाड यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून नुकसान झाले
आहे.तसेच, त्यांच्या घराचे छपर उडून शेजारच्या घरावरती पडल्यामुळे शेजारच्या कौलारू घराचे देखील नुकसान झाले आहे. धामणे गावातील अंगणवाडीचे सर्व पत्रे उडून गेले.
चास : परिसरात सुमारे तीन तास चाललेल्या चक्रीवादळाबरोबर तुफानी पावसाने शिरूर भीमाशंकर राज्य मार्गावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. डेहणे, खरोशी, शिरगाव, मंदोशी, टोकावडे, पाभे, आव्हाट, वाडा, कडधे, चास, आखरवाडी यासह अनेक गावांमधील शाळा, अंगणवाडी,
आरोग्य उपकेंद्रे, यासह घरांचे पत्रे, कौले उडाली, भिंती पडल्या, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या
कांदा, तांदूळ, बाजरी व अन्य शेतीमाल पावसाचे पाणी शिरल्याने भिजला, घरांमधील चीजवस्तूचेही मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले. अनेक भागात वीजेचे खांब कोसळले, तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडीत झाला आहे.
कडूस : परिसरात वादळी वारा व पावसाने मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. घर,
पोल्ट्रीशेड, पॉलिहाउसवरील पत्रे उडून गेले. शेती पिकाचे नुकसान झाले. आंब्याच्या फळांची गळ झाली. विजेचे
खांब भुईसपाट झाले आहेत. आंबा फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. घरे, पोल्ट्रीशेडवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झालेल्यांची संख्या मोठी आहे. महावितरणच्या राजगुरूनगर उपविभागात चाळीस, तर कडूस उपविभागात तीस खांब पडल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्य विद्युत वाहिनीचे सुद्धा अनेक खांब भुईसपाट झाले. याबाबत महावितरणचे शाखा अभियंता आर.वाय.पालखे म्हणाले, परिसरात सुमारे तीस खांब पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

  
जुन्नर तालुका
जुन्नर :
जुन्नर तालुक्यात आज वारा वेगाने वाहत होता. पश्चिम आदिवासी भागात वाऱ्याची तीव्रता अधिक होती. ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जुन्नर शहरातील बँका, पतसंस्था, सरकारी व खाजगी कार्यालयातून तुरळक गर्दी होती. बाजारपेठा बंद होत्या. दुपारनंतर वीजपुरवठाही बंद झाला होता. रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसत नव्हती, सर्वत्र शुकशुकाट होता. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, मात्र वादळाची तीव्रता अधिक होती. आदिवासी भागातील आपटाळे येथील माध्यमिक शाळेच्या इमारतीचे पत्रे व भवानी माता मंदिराचे शेड, उच्छिल व राजूर येथील आरोग्य केंद्राचे पत्रे, घाटघर येथील एका शेडचे पत्रे जोराच्या वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाले आहे.
आपटाळे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. रस्त्याकडेला असणारी झाडे उन्मळून पडून मोठं मोठ्या झाडांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी पत्रे उडल्याच्या घटना घडल्या आहेत. आदिवासी भागातील वीजप्रवाह खंडित झाला असून, विजेचे खांब कोलमडून पडल्याच्या घटना निरगुडे ते येनेरे रस्त्यावर घडल्या आहेत. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ओढ्यांमधून पाणी वाहू लागले होते, तर शेतामध्ये पाणी साचले होते. 
आळेफाटा : परिसरात आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, पावसाचे प्रमाण त्यामानाने कमी असले, तरीही वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. परिसरातील वडगाव आनंद, आळेफाटा, आळे, राजुरी, बेल्हे, आणे, साकोरी पट्ट्यात, सकाळपासूनच वातावरणात गारवा व पावसाळी वातावरण होते. त्यानंतर बहुतेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने मोठमोठी झाडे हलताना अक्षरशः चवऱ्या ढाळत असल्याचे चित्र दिसून येत होते. बेल्हे - मंचर रस्त्यावर साकोरीच्या मुळेवस्तीजवळ रस्त्यावर झाड उन्मळून पडले. काही ठिकाणी मका, हत्तीगवत सारखी चारापिके भुईसपाट झाली.  

आंबेगाव तालुका
मंचर :
  पुणे- नाशिक रस्त्यावर मंचर शहरात शिवगिरी मंगल कार्यालयसमोर व नालंदा स्कूलजवळ रस्त्यात दोन झाडे कोसळली. विजेचे खांबही रस्त्यापर्यंत वाकले होते. त्यामुळे वादळी वाऱ्यात तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक ग्रामस्थ व महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करून जेसीबीच्या साह्याने रस्त्यातील झाडे बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. 20 ते 25 गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. दुपारी तीननंतर वाऱ्याचा पावसाचा वेग वाढला होता. नालंदा स्कूलजवळ झाडे कोसळली. पण, त्यावेळी रस्त्यावर वाहन नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मंचर शहरात अनेक पत्रे उडून गेले असून, विजेचे खांब वाकले आहेत. अशीच परिस्थिती अवसरी खुर्द, पिंपळगाव, गावडेवाडी, तांबडेमळा, भोरवाडी, शेवळवाडी, मोरडेवाडी, लांडेवाडी, वडगाव काशिंबेग, निघोटवाडी, एकलहरे, सुलतानपूर, चांडोली खुर्द आदी गावात होती. महावितरण कंपनीचे विजेचे खांब व वाहिन्या अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे अवसरी खुर्द, गावडेवाडी, चांडोली, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपळगाव, मंचर, मोरेवाडी हे फिडर बंद पडले आहेत. त्यामुळे वीस ते पंचवीस गावांना अंधारातच रात्र काढावी लागणार आहे. नेमके किती थांब कोसळले व किती रुपयांचे नुकसान झाले याबाबतची माहिती समजू शकली नाही.  अनेक मोबाइल कंपन्यांचे टॉवरही बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांची रेंज गुल झाली आहे. त्यामुळे एकमेकांशी होणारा संपर्क तुटला आहे. 
घोडेगाव  : परिसरात सकाळी दहा वाजल्यापासून रिमझिम पाऊस या परिसरात पडत होता .दुपारी मात्र एक वाजल्यापासून जोरदार सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे आणि ठिकाणी झाडे उन्मळून पडली .नारोडी येथील चाफमळा परिसरात बाभळीचे झाड इलेक्ट्रिक पोल वर पडल्यामुळे तीन पोल उन्मळून पडले. इलेक्ट्रिक तारा तुटल्या.  लाईट बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना घडली  नाही. घोडेगाव येथे सह्याद्री धाब्याजवळ एक वडाचे झाड मंचर भीमाशंकर रस्त्यावर एका चार चाकी गाडीवर पडले. पोलीस ठाण्याचे वाहन  पेट्रोलिंग करीत असताना भर पावसात व  वादळात घोडेगाव  पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस अमोल काळे, स्वप्नील कानडे यांनी गाडीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. त्यांनी हे झाड गाडीवरून दूर केले. भवानी माळ येथे एका घरावर झाड पडले. गोहे खुर्द येथील गाडेकर वाडीतील पाच आदिवासी कुटुंबांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने घरातील धान्य व कपडे भिजून गेली आहे.         महाळूंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यात कळंब, चांडोली बुद्रूक, साकोरे, महाळुंगे पडवळ, चास परिसरात
बुधवारी सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. घरांची कौले, गोठयांचे पत्रे उडाले असून,
झाडे कोलमडली आहेत. संध्याकाळी ६ वाजता पाऊस व वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. विठ्ठलवाडी, नांदुर,
टाकेवाडी, कळंब, साकोरे, लौकी आदी गावातील वाडयावस्त्यांवरील रस्त्यांवर झाडे पडली आहेत. पारगाव : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील माळरानावर असलेल्या इंदिरानगर वस्तीवर असलेल्या घरांना जोरदार वाऱ्यामुळे हादरे बसू लागले तर पत्र्यांचा आवाज होऊ लागमुळे सर्व नागरिक घाबरून घराच्या बाहेर आले. या ७० नागरिकांना शिवाजी विद्यालयाच्या इमारतीमध्ये हलविले.तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पारगाव, पोंदेवाडी, खडकवाडी, लोणी, धामणी, काठापुर बुद्रुक, लाखणगाव, शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर आदी गावांत मंगळवार सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर रिमझिम पाऊस पडत होता. बुधवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारी एकनंतर जोराचे वारे वाहू लागले. चक्री वादळामुळे अनेक गावांतील विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली तर अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला. अनेक घरांची, पोल्ट्रीशेड व गोठ्याची पत्रे उडून गेले. आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्याने नुकसान झाले. 
 
पुरंदर तालुका
वाल्हे :
परिसरात आज दिवसभरामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले, तर काही ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत झाला. अनेक ठिकाणी शेतातील ऊस, कडवळ, मका भुईसपाट झाली. काही ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब जमिनदोस्त झाल्याने परिसरात आज दिवसभर विजेचे शटडाऊन झाल्याचे चित्र होते. सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. 

वेल्हे तालुका
वेल्हे : वेल्हे तालुक्यामध्ये चक्रीवादळाचा फटका बसला असून ठिकठिकाणी प्रशासकीय इमारंतीबरोबर नागरिकांच्या घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे, तर अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत.चिरमोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे, विठ्ठलवाडी येथील अंगणवाडीचे, मालवली येथील व सोंडे सरपाले येथील ग्रामपंचायतीचे पत्रे उडाले असून. अंत्रोली येथील पंधरा ते वीस घरांचे नुकसान झाले आहे. अंबवणे गावामधील काशिनाथ ननावरे यांच्याघराची भिंत कोसळली आहे. मार्गासनी येथील संपत रामचंद्र मोहिते यांच्या घराचे पत्रे उडाले असून भिंत कोसळली आहे. साखर गावातील बाळकृष्ण गायकवाड यांच्या घराचे नुसान झाले आहे वेल्हे- चेलाडी रस्त्यावरील  अनेकठिकाणी छोटी मोठी झाडे पडली होती. विंझर, मार्गासनी, आडवली येथे पडलेली झाडे काही वेळातच बाजूला करुन रस्ता मोकळा केला. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जोराच्या वादळामुळे विजेचे खांब मोडले असून, काही ठिकाणी खांब पडले आहे. अनेक ठिकाणच्या विजेच्या तारा तुटल्या आहेत. उच्च दाब वाहिनीचे तेरा खांब, तर लघू दाब वाहिनीचे अठरा खांब उन्मळून पडले आहेत. मालवली गावामधील शुभांगी विकास जाधव (वय ३१) ही महिला धुतलेले कपडे घराजवळ वाळत टाकत असताना बाजूला असलेल्या विजेच्या खांबातून तिला विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. तिची प्रकृती स्थिर आहे.

भोर तालुका
भोर  :
भोर तालुक्यात चक्रीवादळामुळे झाडे पडली, विजेचे खांब पडून तारा तुटल्या, घरांचे छप्पर उडून गेले, तर काही ठिकाणी लोखंडी कमानीही तुटल्या. सुदैवाने वादळी पावसामुळे कोणतीही जीवीत हानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी रात्रभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. बुधवारी सकाळनंतर पावसाचा आणि वा-याचा जोरही वाढला. सकाळी दहाच्या सुमारास भाटघर धरणाजवळ  महावितरणच्या लाईनवर झाड पडल्यामुळे भोर शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचा-यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरठा सुरळीत केला. दुपारी माळवाडीजवळ वीजेचे खांब कोसळले व तारा तुटल्या. महावितरणचे कर्मचारी भर पावसात वीज दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत सुरु होते. आंबवडे, हिर्डोशी व वीसगाव खोऱ्यात काही प्रमाणात वित्तहानी झाली. हिर्डोशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेले. अंबाडे येथील गावच्या प्रवेशव्दारावरील लोखंडी स्वागत कमान वादळामुळे कोसळली. 

दौंड तालुका
दौंड : दौंड तालुक्यात सलग तिसर्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. ७३ दिवसांच्या लॅाकडाउन नंतर १ जून रोजी बाजारपेठेत गर्दी झाली होती, परंतु पावसामुळे पुन्हा रस्ते ओस पडले आहेत. तालुक्यात सलग आज (ता. ३) सलग तिसर्या दिवशी सोसाट्याच्या वार्यासह थांबून- थांबून पाऊस झाला. वार्यामुळे ऊस, मका व कडवळ पिके पडली आहेत. वार्यामुळे वीजवाहक तारांवर झाडे आणि फांद्या पडल्याने आज दिवसभर फांद्या हटविण्याचे काम महावितरणकडून सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित होता. दौंड शहरातून जाणारा नगर- फलटण राष्ट्रीय महामार्ग, मोरगाव- दौंड- सिध्दटेक अष्टविनायक मार्ग आणि शहरातील मुख्य रस्त्यांची कामे अर्धवट राहिली असून, पावसानंतर अवस्था दयनीय झाली आहे. दौंड तालुक्यात सन २०१९ च्या जून महिन्यात ७२.५० मि.मी. पाऊस झाला होता, तर यंदा जूनच्या पहिल्या दोन दिवसांतच ५४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com