

पुणे, ता. ५ ः सण-उत्सवात येथून पुढे ‘डीजे’ चा आवाज वाढणार नाही तसेच लेझर लाईटचा वापर होणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी मंडळांना बजावले असले तरी दहीहंडी उत्सवात त्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. खासकरून लेझर लाईटचा वापरही वाढलेला दिसून आला. यावरून गदारोळ सुरू असताना उत्सवकाळात वापरल्या जाणाऱ्या डोळे दिपवणाऱ्या ‘लेझर लाईट’मुळे नागरिकांच्या दृष्टीचे कायमचे नुकसान होऊ शकते. प्रसंगी दृष्टीही जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
लेझरने डोळ्यांना इजा झाल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत. सण, उत्सव व सार्वजनिक मिरवणुकांमध्ये आकर्षकता आणि शोभेसाठी वापरली जाणारी लेझर लाइट अत्यंत तीव्र असते. त्याद्वारे आकर्षक उजेडाचे पट्टे निर्माण केले जातात. खासकरून गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र अशा विविध उत्सवांमध्ये मंडप, देखावे आणि मिरवणुकीच्या मार्गांवर वेगवेगळ्या रंगांचे व वेगाने फिरणारे आणि लांबपर्यंत जाणारे लेझरच्या प्रकाशाचे झोत फेकले जातात. हेच तीव्र प्रकाशाचे पट्टे हवेत आणि गर्दीवर सातत्याने फिरत असल्यामुळे डोळ्यांच्या टप्प्यांत याचा प्रकाश आल्यास डोळ्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होऊ शकते. ‘डीजे’ आणि संगीताच्या तालावर चालणारे हे रंगीबेरंगी लेझरचे किरण उत्सवाचे वातावरण अधिक भव्य आणि झगमगीत करत असले तरी त्यापासून डोळ्यांना जपायला हवे, असे नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात.
‘लेझर’चा दृष्टी व त्वचेवरही परिणाम
–‘लेझर’ची तीव्र किरणे थेट डोळ्यात पडल्यास डोळ्याच्या मागील दृष्टिपटल जळते.
– यामुळे दृष्टी कायमस्वरूपी धूसर होऊ शकते किंवा पूर्णपणे अंधत्व येण्याचा धोका वाढतो
– ‘लेझर’च्या उष्णतेमुळे डोळ्यातील पेशी अत्यंत कमी वेळेत नष्ट होतात.
– डोळ्यांची जळजळ, पाणी येणे आणि अचानक अंधारी येणे असा त्रास होऊ शकतो
– ‘लेझर’चे किरण मोबाइल किंवा कॅमेऱ्याच्या लेन्सवर पडल्यास कॅमेऱ्याचे सेन्सरही खराब होतात
– डोळेच नव्हे तर त्वचेवर बराच वेळ पडल्यास त्वचेला जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो
---
‘लेझर’पासून कसा कराल बचाव?
- लेझर असलेल्या ठिकाणी जाणे टाळा, नजरेचा संपर्क टाळा
- लेझरचा किरण नागरिकांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर, वाहनचालकाच्या दिशेने सोडू नये
- किरणे आपल्या चेहऱ्याच्या किंवा डोळ्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसताच डोळे मिटा किंवा दुसरीकडे पाहा
- विशिष्ट दर्जाचा प्रोटेक्टिव्ह किंवा गॉगल चष्मा वापरा.
- प्रमाणित, कमी क्षमतेची उपकरणेच प्रशिक्षित व्यक्तींनी वापरावीत
- लहान मुलांचे डोळे अधिक नाजूक असल्याने गर्दीच्या ठिकाणी मुलांना किरणांसमोर उभे करणे टाळा
- ‘लेझर’मुळे अंधारी येणे, डोळे दुखणे किंवा धुरकट दिसू लागल्यास घरगुती उपाय न करता त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे जा.
.........
‘‘उत्सव, मिरवणुका किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीव्र ‘लेझर लाईट’चा किरण थेट डोळ्यांत पडल्यास रेटिनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. काही क्षणांच्या संपर्कानेही डोळे दिपणे, तात्पुरते अस्पष्ट दिसणे, प्रकाशाभोवती वलये दिसणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. उच्च क्षमतेच्या लेझरमुळे रेटिनावर भाजल्यास मध्यवर्ती दृष्टी कमी होणे, काळा ठिपका दिसणे, रंग ओळखण्यात अडचण येणे किंवा कायमस्वरूपी दृष्टीहानीही संभवते. विशेषतः लहान मुले आणि जवळून किरणांच्या संपर्कात येणाऱ्यांना अधिक धोका असतो. संपर्कानंतर दृष्टी धूसर होणे किंवा काळा ठिपका जाणवल्यास डोळे चोळू नयेत आणि तातडीने नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करावी.’’
– डॉ. आदित्य केळकर, नेत्ररोगतज्ज्ञ
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.