घराची नोंद करण्यासाठी गेल्या चार पिढ्या

रामदास वाडेकर
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

गावात प्लेगची साथ आली म्हणून एका समाजाच्या कुटुंबाला गाव डुकरासह गावात बोलाविण्यात आले. त्यांना गावातील स्वच्छतेचे कामही देण्यात आले. या कुटुंबाला गावात मतदानाचा अधिकारही मिळाला. पण, त्यांच्या राहत्या घराच्या नोंदीसाठी त्यांच्या तब्बल चार पिढ्यांना वाट पाहावी लागली.

कामशेत - गावात प्लेगची साथ आली म्हणून एका समाजाच्या कुटुंबाला गाव डुकरासह गावात बोलाविण्यात आले. त्यांना गावातील स्वच्छतेचे कामही देण्यात आले. या कुटुंबाला गावात मतदानाचा अधिकारही मिळाला. पण, त्यांच्या राहत्या घराच्या नोंदीसाठी त्यांच्या तब्बल चार पिढ्यांना वाट पाहावी लागली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्लेगच्या साथीने थैमान घातले होते त्या काळात हैराण झालेले ग्रामस्थ वेगवेगळे उपाय करीत असत. गावातील अस्वच्छतेमुळे त्यात वाढ होत असल्याची ग्रामस्थांचा समज होता. त्यामुळे गावातील घाणीचे साम्राज्य हटविण्यासाठी गाव डुक्कर हा नामी उपाय होता. म्हणून एक प्रयत्न म्हणून खडकाळ्यातील ग्रामस्थांनी निळकंठ या कुटुंबाला त्यांच्याकडील डुकरांसह गावात बोलावले. त्यांच्याकडील गाव डुक्करांनी स्वच्छतेच्या कामाला मदत केली. या कुटुंबाची चौथी पिढी सध्या येथे राहते. पशू वैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात त्यांची घरे आहे. पण तिथे ना विजेची सोय ना पाण्याची. ग्रामपंचायतीत त्यांच्या घराची चार पिढ्यांपासून नोंदच नव्हती. त्यामुळे त्यांना विजेचा जोड घेता येत नव्हता. रहिवासी दाखला मिळत नव्हता.

मतदानाचा अधिकार मिळाल्याने त्यांनी प्रत्येक निवडणुकीत आपला अधिकार बजावला. कोल्हाटी समाजाची भाऊबंदकी येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. सगळ्यांशी मिळून मिसळून प्रेमाने राहणाऱ्या या माणसांनी कामशेत हेच आपले गाव मानले. सुखदु:खाच्या कित्येक आठवणी त्यांच्या या गावाशी जोडल्या आहेत. चार पिढ्या येथे राहतात. पण आपल्या घरची नोंद होत नाही, याचे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तरी घराची नोंद व्हावी, यासाठी अनेकवेळा अर्ज केले.

सरपंच, ग्रामसेवक, गावातील कारभाऱ्यांना विनंत्या केल्या. मासिक सभेत, ग्रामसभेत निळकंठ कुटुंबीयांच्या घराची नोंद व्हावी, असे ठराव मंजूर केले. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. शेवटी या वॉर्डातील सदस्य आणि माजी उपसरपंच गणपत शिंदे यांनी यात पुढाकार घेतला. सातत्याने पाठपुरावा केला आणि निळकंठ कुटुंबातील पाच जणांची नावे ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदली गेली. यासाठी गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, विस्ताराधिकारी वडे, सरपंच रूपाली शिनगारे, सारिका शिंदे, सारिका घोलप, अभिमन्यू शिंदे, संतोष कदम यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे आज नकुल यादव निळकंठ, सागर मारुती निळकंठ, भीमराव यादव निळकंठ, अर्जुन यादव निळकंठ, शिवाजी तुकाराम निळकंठ यांच्या नावे घराची नोंद झाली आहे. शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमणांवर, कर आकारणीसाठी भोगवटादार सदरी नोंद असा शेरा मारून ग्रामपंचायतीच्या दप्तरी निळकंठ कुटुंबातील सदस्याच्या नावे नमुना नंबर ‘८ अ’ला नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The last four generations to record the house