agn_ltr28april_2026_1_txt.txt

agn_ltr28april_2026_1_txt.txt
Published on

लातुरात खरीप हंगाम
पूर्वतयारी नियोजन बैठक

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रातील खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारी व नियोजन आढावा बैठक आमदार रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २७) शासकीय विश्रामगृहात झाली. किसान मोर्चाचे विक्रमकाका शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नाथसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव साळुंके, छाया चिंचोलकर, रेणापूर पंचायत समितीचे उपसभापती शरद दरेकर, लातूर तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड, रेणापूर तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे, औसा अधिकारी दत्तात्रय हाके, यांच्यासह पीक विमा कंपनीचे अधिकारी, गुण नियंत्रण कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व इतर संबंधित उपस्थित होते. बैठकीत विविध विषयासह कृषी योजनांचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार युरिया, डीएपी खताचा आणि बियाण्याचा वेळेत पुरवठा करण्यात यावा, पेरणीसाठी खताची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही, याची काळजी घ्यावी, आदी सूचना आमदार कराड यांनी केल्या.

भाव कोलमडल्याने
कांद्यावर रोटावेटर
धाराशिव : बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने पदरचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. या विदारक परिस्थितीला कंटाळून जेवळी (ता. लोहारा) येथील विशाल कारभारी या युवा शेतकऱ्याने रविवारी (ता.२६) आपल्या उभ्या कांदा पिकात रोटावेटर फिरवून पीक उद्ध्वस्त केले. कष्टाने पिकवलेल्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तीन एकर कांद्याची लागवड केली होती. खते, औषध फवारणी आणि मजुरी असा हजारो रुपयांचा खर्च त्यांनी केला. पीक जोमात असल्याने यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, सध्या बाजारपेठेत कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. कांदा बाजारात नेण्याचा वाहतूक खर्च आणि मजुरी देखील निघणे कठीण झाले आहे. बाजारातील कवडीमोल दरामुळे निराश झालेल्या कारभारी यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत पिकात थेट रोटावेटर फिरवून पीक मातीत मिसळले.

महाराष्ट्र दिनी पत्रकारांची कार्यशाळा
धाराशिव : ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने सरकारने माझं गाव,आरोग्य संपन्न गाव अभियान हाती घेतले असून अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. एक) सकाळी साडेनऊ ते दहा दरम्यान पत्रकारांची कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी, लोकसहभागातून गावपातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यासाठी या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी कार्यशाळेस उपस्थित राहून अभियानाची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com