गृहनिर्माण स्वयंपूर्ण पुनर्विकास योजनेबाबत नाबार्ड सकारात्मक

अनिल सावळे
Thursday, 24 September 2020

मुंबईसह काही शहरांमध्ये गृहनिर्माण स्वयंपूर्ण पुनर्विकास योजनेला जिल्हा बॅंकेकडून निधी उपलब्ध व्हावा. याबाबत नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापकांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ते रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करून प्रश्‍न मार्गी लावतील. त्यामुळे ही योजना पूर्ववत सुरू होईल, असा विश्‍वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्‍त केला.

पुणे : मुंबईसह काही शहरांमध्ये गृहनिर्माण स्वयंपूर्ण पुनर्विकास योजनेला जिल्हा बॅंकेकडून निधी उपलब्ध व्हावा. याबाबत नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापकांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ते रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करून प्रश्‍न मार्गी लावतील. त्यामुळे ही योजना पूर्ववत सुरू होईल, असा विश्‍वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्‍त केला. दरेकर यांनी या मुद्यावर नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक एल.एल.रावळ यांच्याशी बुधवारी चर्चा केली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, जिजाबा पवार, भाजप युवा मोर्चाचे प्रा.सचिन जायभाये यावेळी उपस्थित होते. 

दरेकर म्हणाले, मुंबईसह काही प्रमुख शहरांमध्ये गृहनिर्माण स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना सुरू होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून या योजनेसाठी निधी देण्यात येत होता. त्यामुळे इमारतीमधील सभासदांना मोठी जागा आणि कॉर्पस मिळणार आहे. या योजनेतून मुंबईत चार इमारतीही उभ्या केल्या. याशिवाय स्वयं पुनर्विकासाचे १,६०० प्रस्ताव आहेत. अशा परिस्थितीत नाबार्डने जिल्हा बॅंकेवर निर्बंध लादले आहेत. जिल्हा बॅंका रिअल इस्टेटला अर्थपुरवठा करू शकत नाही, असे रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महत्त्वकांक्षी योजना थांबली आहे. ही योजना सर्वसामान्यांसाठी गरजेची असून, कार्यान्वित व्हावी, अशी मागणी नाबार्डकडे करण्यात आली आहे. 

'करून दाखवलं', मुंबईची तुंबई झाली
 
पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणे पुन्हा पाण्याखाली गेली. याबाबत दरेकर यांनी शिवसेनेच्या कारभारावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, 'करून दाखवलं' त्यांनी. तसे मुंबईत होर्डिंगही लागले आहेत. मुंबईची तुंबई झाली आहे. त्यांनी त्याचीही जबाबदारी घ्यावी. पावसाळ्यात पाणी कोठे साचते, हे माहीत आहे. पैशांची कमी नाही. तरीही मुंबई दरवर्षी पाण्यात जाणार असेल तर महापालिकेत 30-40 वर्षे सत्ता उपभोगून काय केले? मुंबई शहरातील मूळ प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष नाही. त्यावर 'करून दाखवलं' म्हणून मिरवण्यात वेळ जात आहे. 

खडसेंबाबत निर्णय पक्ष घेईल 

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा सुरू आहे. याबाबत दरेकर म्हणाले, ते ज्येष्ठ नेते आहेत. राज्य आणि देशपातळीवर पक्षात निर्णय घेणारी यंत्रणा आहे. घरातील बाबीवर चार भिंतीच्या आत मान अपमान करीत मार्ग निघत असतो. नाथाभाऊंसारख्या जेष्ठ नेत्याबाबत मी बोलणे संयुक्‍तिक वाटत नाही. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar said that funds should be made available from the District Bank for the Housing Self Redevelopment Scheme