

आंधळगाव, ता. २९ : सादलगाव (ता. शिरूर) येथे दूध आणून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या २५ वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. २८) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात हर्षवर्धन रमेश होळकर यांच्या उजव्या पायाला जखम झाली. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वारंवार मागणी करूनही वनविभागाने पिंजरा बसविला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन होळकर दूध आणण्यासाठी गणपतीमाळ येथे गेला होता. दूध घेऊन तो दुचाकीवरून सादलगावच्या दिशेने परतत असताना चव्हाण वस्ती परिसरातील मच्छिंद्र मिठे यांच्या कांदा चाळीजवळ बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी घर गाठून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना मांडवगण फराटा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी दौंड येथे पाठविण्यात आले.
दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. मात्र, उपचारासाठी जाताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, बुधवारी (ता. २८) सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास वडगाव रासाई-सादलगाव रस्त्यावरील साठे वस्ती परिसरात नीलेश राजेंद्र होळकर यांना बिबट्याची मादी व दोन बछडे दिसून आली होती. या परिसरात बिबट्याचा वारंवार वावर आढळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडे वारंवार मागणी करूनही पिंजरा बसविण्यात आला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सादलगाव येथे बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने पिंजरा बसविण्याबाबत वनविभागाकडे मागणीपत्र सादर करावे. त्यानंतर संबंधित ठिकाणी वनविभागाकडून पिंजरा बसविण्यात येईल, असे शिरूरचे वनपरिक्षेत्राधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.