

नसरापूर, ता. १३ : कांबरे खे.बा. (ता. भोर) येथील डोंगरभागात गाई चरण्यासाठी नेत असताना शेतकऱ्यासमक्ष दोन बिबट्यांनी हल्ला करत दोन वासरांना ठार मारले. या घटनेमुळे कांबरे, देगाव, नायगाव, करंदी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.
कांबरे येथील शेतकरी शेखर कोंढाळकर हे शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांची जनावरे डोंगरात चारण्यासाठी जात होते. त्यावेळी काही अंतरावर एकाच वेळी दोन बिबट्यांनी त्यांच्या जनावरांच्या कळपामधील दोन वासरांवर हल्ला केला. या हल्ल्याने ते भयभीत झाले. त्यांनी धावतच गावात जाऊन इतर ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. काही ग्रामस्थ लगेचच त्या घटनास्थळी पोहचले. ग्रामस्थांची चाहूल लागताच दोन्ही बिबट्यांनी तेथून पळ काढला. मारून अर्धवट खाल्लेली दोन वासरे त्याठिकाणीच पडली होती. या घटनेबाबत नागरिकांनी नसरापूर वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वन कर्मचारी पांडुरंग गुट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही वासरांचा पंचनामा केला.
येथील शेतकरी कैलास कोंडे यांनी सांगितले की, या भागात बिबट्यांचा वावर खूपच वाढला आहे. शेतकऱ्यांना सायंकाळनंतर रानात थांबता येत नाही. शेतीची कामे, गुरांचा चारा आणण्यासाठी जीव मुठीत घेऊन रानात जावे लागत आहे. वनविभागाने याबाबत तातडीने बंदोबस्त करावा.
वनकर्मचारी गुट्टे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून कांबरे परिसरात बिबट्याचा वावर आहे. शेतकऱ्यांनी गुरांसह या भागात काही दिवस जाऊ नये. गोठ्यातील जनावरांनादेखील योग्य संरक्षण देऊन काळजी घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.