

आळेफाटा, ता. ७ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जंगलतोड, कमी झालेले नैसर्गिक भक्ष्य आणि उसाच्या शेतीमुळे निर्माण झालेला मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर बनला असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
साधारणपणे तीन-चार दशकांपूर्वी वाघ, तरस, लांडगे यांसारखी श्वापदे डोंगरकपारीत वास्तव्यास होती. मुबलक जंगल आणि शिकारीयोग्य प्राण्यांची उपलब्धता यामुळे त्यांचा मानवी वस्तीत वावर नव्हता. मात्र, काळ बदलला आणि औद्योगिकीकरण, जमिनींचे वाढते भाव यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. येडगाव, पिंपळगाव जोगा, वडज, माणिकडोह आणि चिल्हेवाडी या पाच धरणांमुळे मोठे जंगलक्षेत्र पाण्याखाली गेले. माणसांचे पुनर्वसन झाले, पण वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचा प्रश्न दुर्लक्षित राहिला. याच धरणांमुळे ऊसशेती वाढली आणि सैरभैर झालेल्या बिबट्यांना मानवनिर्मित अधिवास मिळाला, ज्यामुळे संघर्षाची ठिणगी पडली.
सुरुवातीला पाळीव जनावरांवर उदरनिर्वाह करणारे बिबटे, आता जनावरे बंदिस्त झाल्याने शेतात काम करणाऱ्या महिला, लहान मुले आणि एकट्यादुकट्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. वनविभागाकडून पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्यात येते, परंतु माणिकडोह येथील निवारा केंद्रातील जागेच्या मर्यादेमुळे त्यांना पुन्हा अधिवासात सोडले जाते, ज्यामुळे समस्या मूळ जागेवरच राहते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन, वन्यजीव तज्ज्ञ आणि संशोधकांनी एकत्र येऊन ठोस धोरण आखण्याची गरज आहे. अन्यथा, भविष्यात खाद्य आणि पाण्याच्या शोधात बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर सौर दिव्यांचा वापर आणि वृक्षारोपण यांसारख्या उपाययोजनाही महत्त्वाच्या आहेत.
ही नागरिकांची जबाबदारी
शेतकऱ्यांनी शेतावर जाताना हातात काठी घेऊन जावे
लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठवू नये
ज्या विभागात बिबट्या आढळला त्या भागात पिंजरा लावणे, जनजागृतीसाठी फ्लेक्सबोर्ड लावणे
एकट्यादुकट्याने न फिरणे
उसक्षेत्रातून येता-जाताना मोठमोठ्याने आवाज करणे, गाणी म्हणणे, काठीला घुंगरे बसवून त्यांचा आवाज करणे
संघर्षाची भीषणता
गेल्या सोळा वर्षांतील आकडेवारी या संघर्षाची तीव्रता दर्शवते. या काळात बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे तीन ते साडेतीन हजार पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवाने, आतापर्यंत २८ ते ३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, नव्वद ते शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची गरज
बिबट्यांच्या अचूक संख्येचा आणि त्यांच्या भ्रमंतीमार्गाचा अभ्यास करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. परदेशांप्रमाणे प्रत्येक बिबट्याला जीपीएस प्रणाली बसविल्यास त्याचा ठावठिकाणा समजेल. यामुळे धोक्याची सूचना देणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे सोपे होईल व समस्येच्या मुळाशी पोहोचता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.