पुणे : सांगवडेत अखेर 'त्यांची' परतभेट

पुणे : सांगवडेत अखेर 'त्यांची' परतभेट

पिंपरी : रात्रीचा नेहमीचाच काळाकुट्ट अंधार...मात्र, त्यांची परत भेट पाहण्यासाठी सर्वजण आसुसले...अखेर, ऊसाच्या शेतामधून गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला...टॉर्चच्या प्रकाशात तिचे भेदक डोळे चमकले...वनखात्याने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपवरुन सांगवडे येथील बिबट्या मादीने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तिची 2 नवजात पिल्ले सुरक्षितपणे अन्य ठिकाणी नेले. 

मावळ तालुक्‍यातील सांगवडे गावात मंगळवारी सकाळी ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची 2 नवजात पिल्ले आढळून आली. कात्रज येथील वन्यप्राणी अनाथालयाचे मुख्य अधिकारी अनिल खैरे आणि डॉ.सुचित्रा सूर्यवंशी-पाटील यांनी दोन्ही पिल्लांना सुरक्षितस्थळी नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्याचा अहवाल सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे यांना कळविला. त्यावर, उपवनसंरक्षक लक्ष्मी ए. आणि संजय मारणे यांनी या पिल्लांची त्यांच्या मातेसमवेत पुनर्भेट घडवून आणण्याचा निर्णय घेतला.

तत्पूर्वी, वन खात्याच्या अधिकारी रेखा वाघमारे, कात्रज अनाथालयाचे उमेश परदेशी, अभिजित भुकण यांनी पिल्लांची वजन-मापे घेऊन त्याआधारे त्यांना शेळीचे दूध आणि पाण्याचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करुन शास्त्रीय पद्धतीने त्यांना पाजले. मादी बिबट्या आणि तिच्या दोन्ही पिल्लांच्या पुनर्भेटीसाठी रात्रीची वेळ निवडण्यात आली. सूर्यास्तानंतर तासाभरातच ही पिल्ले जिथे होती त्याच शेताची जागा निश्‍चित करण्यात आली. त्यासाठी दुपारनंतरच दहा चौरस एकराचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला.

संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अनाथालयाचे दोघे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना ऊस तोडणीच्या परिसरापासून सुमारे 10 मीटर अंतरावर गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. टॉर्चच्या प्रकाशात बिबट्याचे डोळे चमकल्याचे दिसून आले. त्यानंतर, त्यांनी लगेच वेळ न दवडता तेथे कॅमेरा ट्रॅप सेट केला आणि त्वरीत माघारी परतले. मात्र, संपूर्ण रात्र वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जागून काढत दूर अंतरावरुन गस्त घातली.

तेव्हा, त्यांना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या घटनास्थळी येऊन गेल्याचे कळाले. पहाटेच्यावेळेस परत तेथे जाऊन पाहिले असता मादी बिबट्याने तिची पिल्ले सुरक्षितपणे अन्य ठिकाणी नेल्याचे आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com