जेरबंदी नव्हे; स्वसंरक्षण महत्त्वाचे!

Leopard
Leopard

जुन्नर वनविभागांतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्‍यात २००१ ते २०१८ या अठरा वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत, जखमी व्यक्ती, तसेच पाळीव प्राणी, पिकांचे नुकसान यापोटी सरकारकडून ४ कोटी २० लाख ९२ हजार ७३ रुपयांची मदत दिली आहे. बिबट्या पकडल्यानंतर रिकामी झालेली जागा दुसरा बिबट्या घेतो. त्यामुळे पिंजरा लावून पकडणे हा बिबट्याच्या समस्येवरील उपाय नाही. नागरिकांनी जागरूक राहून स्वसंरक्षण करणे आवश्‍यक आहे.
- जयरामे गौडा, उपवनसंरक्षक, जुन्नर

जुन्नर उपविभागात बिबट्याच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असल्याने येथे बिबट्या स्थिरावला असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बिबट्याला पकडणे हा बिबट नियंत्रणाचा तात्पुरता उपाय आहे. वाढलेल्या ऊस क्षेत्रामुळे या भागात २००१ पासून बिबट्याच्या समस्येने उग्र रूप धारण केलेले आहे. सन २००१ ते जानेवारी २०१९ या काळात बिबट्याच्या हल्ल्यात तीस व्यक्ती मृत पावल्या असून, ९८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात ६ हजार ३२९ पाळीव प्राणी मृत अथवा जखमी झाले आहेत. बिबट्या अथवा इतर वन्य प्राण्यांमुळे ३२४.०८३ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापोटी वनविभागाने मागील अठरा वर्षांत एकूण ४ कोटी २० लाख ९२ हजार ७३ रुपयांची मदत दिली आहे. 

भरपाईच्या रकमेत वाढ
बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना २००१ मध्ये दोन लाख रुपये, तर जखमी झालेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर मदतीत पाच लाख, दहा लाख रुपये, अशी वाढ करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीपासून (सन २०१८) मदतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. सध्या मृत व्यक्तीस पंधरा लाख रुपये, अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची, तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस सव्वा लाख रुपयांची मदत दिली जात आहे.

प्रबोधनाची गरज
ऊस शेतीमुळे बिबट्याची समस्या ही कायमस्वरूपी असणार आहे. धोका पत्करून मेंढपाळ उघड्यावर वाडा लावून झोपतात. शेतात राहणाऱ्या व्यक्तींनी घराभोवती कंपाउंड घालणे आवश्‍यक आहे. बिबट्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वसंरक्षणाचे उपाय करणे आवश्‍यक आहे. वनविभागातर्फे प्रबोधन केले जात आहेत.

रात्रीचे भारनियमन न करण्याची मागणी 
सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असून, उसात लपून बसलेले बिबटे बाहेर पडत आहेत, त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. यामुळे बिबट प्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळी भारनियमन करू नये, अशी मागणी जुन्नर वनविभागाच्या वतीने जिल्हाधिकारी व वीज कंपनीकडे करण्यात आलेली आहे, अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिली. 

माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवारा केंद्रात सुमारे बत्तीस बिबटे आहेत. त्यात बावीस मादी बिबट्यांचा समावेश आहे. 
- डॉ. अजय देशमुख, वैद्यकीय अधिकारी, बिबट निवारा केंद्र, माणिकडोह

वनविभागाकडून दिलेली मदत
तीस मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ७१ लाख १३ हजार ९०० रुपये 
जखमी ९८ व्यक्तींना १० लाख ७३ हजार ४०० रुपये 
पाळीव प्राणी मृत अथवा जखमी २ कोटी ८६ लाख २ हजार ३८१ रुपये 
पिकांच्या नुकसानापोटी ५३ लाख २ हजार ३९२ रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com