भिगवण भागात वाढली बिबट्याची दहशत

भिगवण भागात वाढली बिबट्याची दहशत

भिगवण : कर्जत व करमाळा तालुक्यामध्ये बिबटया धुमाकुळ घालत असताना येथील सोनटक्के वस्ती परिसरामधील ऊसाच्या शेतामध्ये एका शेतकऱ्यास बिबटया दिसल्याची माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. इंदापुर तालुक्यामध्ये बिबटयाच्या आगमनाच्या चर्चा सध्या भिगवण व परिसरात असून, यामुळे बिबटयाची दहशत निर्माण झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूर तालुक्याच्या लगत असलेल्या करमाळा व कर्जत तालुक्यामध्ये बिबटया चांगला धुमाकुळ घालत आहे. करमाळा तालुक्यातील तीन व्यक्तींचा जीव बिबटयांने घेतला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातुन इंदापुर तालुक्यात बिबटया सहज प्रवेश करु शकतो अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. 

याबाबत दोन्ही तालु्क्याच्या सिमाभागत पिंजरे लावण्याची मागणीही नागरिकांनी केली होती. याच पार्श्वभुमीवर इंदापुर तालुक्यातील भिगवण येथील सोनटक्के वस्ती परिसरामध्ये पोपटराव जगताप यांचे शेतामध्ये ऊस तोडणी सुरु होती. ऊस तोडणी कामगार दादाजी सोनवणे व दिपक तलवारे यांना ऊसाच्या शेतामध्ये आवाज आल्याचे जाणवले. बॅटरीने पाहणी केली असता त्यांना बिबटया सदृश्य प्राणी दिसल्याचे ऊस तोडणी कामगारांनी सांगितले. याबाबत वनविभागास 
कल्पना दिल्यानंतर वनविभागातील अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

सध्या भिगवण, स्वामी चिंचोली, डिकसळ भागामध्ये बिबटयाची मोठ्या प्रमाणात दहशत दिसुन येत आहे. दररोज नदीकाठी गुरे चारण्यासाठी नेणारे गुराखे सध्या गुरे घेऊन जाणे टाळत आहेत तर शेतकरीही रात्रीच्या वेळी शेतास पाणी देण्यासाठी धजावत नाहीत. वनविभागाच्या वतीने बिबटयाच्या 
अस्तित्वाबाबत सोक्षमोक्ष लावुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

याबाबत वनअधिकारी डॉ. राहुल काळे म्हणाले, ''शेजारच्या करमाळा व कर्जत तालुक्यामध्ये बिबटयाचा वावर आहे. इंदापुर तालुक्यामध्ये बिबटया असल्याची खात्रीलायक माहिती नाही. खबरदारीचा उपाय म्हणुन ज्या ठिकाणाहुन बिबटया इंदापुर तालुक्यामध्ये प्रवेश करु शकतो अशा संभाव्य ठिकाणी पिंजरे 
बसविण्यात आले असून, नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com