पाण्याच्या भीतीने घटतोय उसाचा गोडवा

Sugercane
Sugercane

बारामती (पुणे) : पाऊस पडला नाही, तरी वरची धरणे भरली, की नीरा खोऱ्यात एरवी उसाच्या लागवडीला जोर येतो. यंदा मात्र 53 हजार हेक्‍टरपैकी अवघ्या 8 हजार 235 हेक्‍टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. नीरा देवघरचे पाणी मिळणार नसल्याने इंदापूर तालुक्‍यात, तर पावसाच्या पाठशिवणीमुळे इतर तालुक्‍यांमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीतून काढता पाय घेतला आहे.

उपविभागात दौंड, बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्‍यांत उसाचे क्षेत्र सरासरी 53 हजार हेक्‍टर असून त्यापैकी आडसाली हंगामात 22 हजार हेक्‍टर क्षेत्रात उसाची लागवड होते. आडसाली लागवडीचा हंगाम हा 15 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान असतो. यंदा मात्र उसासाठी मशागत केली, सऱ्याही काढून ठेवल्या; परंतु शेतात कांडे दाबायचे की नाही या विवंचनेत शेतकरी आहेत. नीरा देवघर धरणाचे 4.71 टीएमसी पाणी न मिळण्याच्या शक्‍यतेने उसाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. आतापर्यंत या उपविभागात सरासरी क्षेत्राच्या फक्त 30 टक्के एवढीच लागवड झाली आहे.

मजुरांचीही झाली अडचण
एरवी उसाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ असते. लागवडीच्या हंगामाच्या काळात गावागावांतील सऱ्या काढून उसाची लागवड करून देणारे मजूरही "बिझी' असतात. गेल्या अनेक वर्षांतील हे चित्र व त्यातून मजुरांचा एकरी पाच हजार रुपयांपर्यंत वाढलेला दर हे अर्थकारण यंदाच्या हंगामात मात्र कोलमडून पडले आहे. या वर्षी एकूणच लागवडीचे प्रमाण घटल्याने मजूरही नेहमीच्या ऊस उत्पादकांच्या शेतात पाच हजारांऐवजी चार हजारांवर समाधान मानत आहेत.

तीन वर्षांची दुष्काळी स्थिती, आताही पावसाने दिलेला ताण, याचा परिणाम लागवडीवर झालेला आहे. त्यातच इंदापूर व बारामती तालुक्‍यात नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनात काही घट येईल, याची भीती असल्याने लागवडीत काही घट आली आहे.
प्रशांत काटे, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना


सततच्या अवर्षणामुळे उसासारखे पीक घ्यावे की नको, या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यात धरणातील एक पाण्याचे आवर्तन कमी होण्याच्या शक्‍यतेची भर पडली आहे, त्यामुळे उसाच्या लागवडी घटल्या आहेत.
अशोक काळे, सणसर, ता. इंदापूर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com