आंबेडकरांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्राचे कुतूहल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

 ‘महात्माजी’ असा उल्लेख करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रावर आज अनेकांची नजर खिळून राहत होती. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस संस्थेच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांसाठी हे पत्र कुतूहल ठरले.

पुणे - ‘महात्माजी’ असा उल्लेख करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रावर आज अनेकांची नजर खिळून राहत होती. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस संस्थेच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांसाठी हे पत्र कुतूहल ठरले.

संग्रहालयाच्या संस्थापक संचालक संजीवनी मुजुमदार म्हणाल्या की, माई आंबेडकर यांच्यासोबत विजय सुरवाडे हे सहायक असत. त्यांनी आमच्या संग्रहालयासाठी बाबासाहेबांच्या वस्तू देताना हे पत्र दिले. साबरमती येथील गांधीजींसंबंधीच्या संग्रहालयात हे पत्र होते. ते आम्हाला सुरवडेंनी दिले. यावर ‘गांधी संग्रह’ असा शिक्का आहे.

गांधीजी ‘हरिजन’ हे वृत्तपत्र चालवायचे. त्यात बाबासाहेबांनी, ‘अस्पृश्‍यांना मंदिरात प्रवेश मिळावा, याबाबत आपले विचार प्रसिद्धीसाठी पाठवले आहेत व त्याची प्रत आपल्याला माहितीसाठी पाठवत आहे,’ असे या इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

‘दामोदर हॉल, परेल, बॉम्बे नंबर १२’ या पत्त्यावरून ता. १२ फेब्रुवारी १९३३ रोजी लिहिलेले पत्र ‘एम. के. गांधी, येरवडा जेल, पुणे’ या पत्त्यावर १६ फेब्रुवारी १९३३ रोजी मिळाल्याची नोंद आहे. या दोघांमध्ये वैचारिक मतभेदांची चर्चा काही जण करीत असले, तरी परस्परांमधील आदरभाव असल्यामुळे बाबासाहेबांनी ‘महात्माजी’ असे संबोधन वापरले, असे आज संग्रहालयात आलेले लोक या पत्राचा आधार घेत बोलत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter from Dr. BabaSaheb Ambedkar to Mahatma Gandhi