वाई:-व्याहळी (पूनर्व) येथे विद्यासागर माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त पत्र लिहिण्याचा अनोखा उपक्रम
व्याहळीत रंगला पत्रलेखनाचा उपक्रम
विद्यासागर माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात
वाई, ता. १ : व्याहळी पुनर्वसित (ता. वाई) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ (सासवड) संचलित विद्यासागर माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या आप्तेष्टांना पत्र लिहिण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला.
पूर्वी पत्र म्हणजे प्रत्येकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचे अविस्मरणीय आणि एकमेकांशी संपर्क साधण्याचे एकमेव साधन. सर्वात जास्त काळ जनमनांवर अधिराज्य गाजवणारे, कितीतरी भावनांचे, निरोपांचे व्यक्त रूप, चांगल्या वाईट घटना, आठवणीचे वाहक म्हणून जबाबदारी पार पाडणारे सर्वांचे जिवलग मित्र म्हणजे पत्रच हाेते; पण आज मोबाईलच्या जमान्यात पत्र लुप्त झालं आणि कदाचित नातेसंबंधांमधला आपुलकीचा ओलावाही डिलिट होऊ लागला. भाषा विषयांच्या पेपरमध्ये पत्रलेखनाच्या प्रश्नाचे गुण मिळवण्याइतकाच पत्र या शब्दाशी आजच्या पिढीचा संबंध राहिला आहे. किंवा फार तर लहानपणी ‘आई माझं पत्र हरवलं’ या खेळाइतकाच काय तो संबंध राहिला आहे. आज तो खेळही हरवला आणि पत्रही! त्यामुळेच विद्यार्थ्यांना पत्राचे प्रकार आणि अपेक्षित पत्त्यावर पत्र पोहोचण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अवगत व्हावा, या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापिका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पत्र लिहिण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
यावेळी आंतरदेशीय पत्र लिहिण्याच्या या अनोख्या प्रत्यक्ष अनुभवाचे विद्यार्थ्यांना खूपच औत्सुक्य वाटले. आपल्या भावना शब्दात मांडण्यात सर्वजण मग्न होते. खरोखरच आपण लिहिलेले पत्र अचूक ठिकाणी कसे आणि कधी पोहोचणार, याची उत्सुकता सर्व विद्यार्थ्यांना लागली असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आप्तेष्टांना पत्र हातात मिळाल्यावर आनंदाचा, आश्चर्याचा एक सुखद धक्का बसणार आहे, यात शंकाच नाही. संस्थेचे सर्व पदाधिकारी, केंद्र प्रमुख, शालेय समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालकवर्ग या सर्वांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
-----
छायाचित्र :.........07647-
व्याहळी पुनर्वसित (ता. वाई) : विद्यासागर माध्यमिक विद्यालयातून आपल्या आप्तेष्टांना आंतरदेशीय पत्र लिहून पाठविताना विद्यार्थी.
..............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

