Pune Crime News
Pune Crime Newssakal

Pune Crime News : कामगाराचा खून करणाऱ्या पर्यवेक्षकाला जन्मठेपेसह 5 हजाराची दंडाची शिक्षा

प्रेयसीला मोबाईलवरून संपर्क करत सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून कंपनीतील कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणाऱ्या पर्यवेक्षकाला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पुणे : प्रेयसीला मोबाईलवरून संपर्क करत सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून कंपनीतील कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणाऱ्या पर्यवेक्षकाला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी हा निकाल दिला.

संतोष शहाजी राठोड (वय २६, मूळ रा. शिंगोली, धाराशिव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दामोदर कृष्णा जबल (रा. धारावी, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कंपनीतील कामगारांचा ठेकेदार अमित जाधव यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २० ऑगस्ट २०१८ रोजी शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे ही घटना घडली होती.

जबल व राठोड हे येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. या ठिकाणी जबल हा कामगार, तर राठोड हा पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. कंपनीतील एका तरुणीशी राठोड याचे प्रेमप्रकरण सुरू होते. या वेळी जबल हा तरुणीच्या मोबाईलवर मिसकॉल देत होता. तरुणीने फोन केल्यानंतर तो फोन घेत नसे. हा प्रकार तिने राठोड याला सांगितला. त्यामुळे राठोडने प्रेयसीकडून तो नंबर घेत त्यावर संपर्क केला. तेव्हा त्याला नंबर जबलचा असल्याचे समजले. प्रेयसीला सतत कॉल करत त्रास देत असल्याच्या कारणावरून १८ ऑगस्ट रात्री साडेबाराच्या सुमारास दोघांमध्ये भांडणे झाली.

भांडणावेळी जबर मारहाण झाल्याने जबल याला दवाखान्यात नेण्यात आले. घटनेच्या दोन दिवसानंतर राठोड याला जबल कंपनीच्या प्रवेशद्वारावर दिसला त्यानंतर त्याने त्याकडे असलेल्या चाकूने त्याच्या पोटात वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात, राठोड याला अटक करत त्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर व सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. त्यांनी पंधरा साक्षीदार तपासले. या वेळी आरोपीची प्रेयसी व प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणात तत्कालीन शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी तपासी अंमलदार म्हणून काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com