महिलेच्या खूनप्रकरणी तरुणीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविले; तसेच बालकासह एका महिलेचे अपहरण केले व नंतर तिचा खून केला. या प्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पुणे-  पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविले; तसेच बालकासह एका महिलेचे अपहरण केले व नंतर तिचा खून केला. या प्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निकिता संजय कांगणे (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. मधू रघुनंदन ठाकूर यांचा खून झाला होता. त्यांचे पती रघुनंदन (वय २३, रा. वैदवाडी, हडपसर, मूळ उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली होती. अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी तेरा साक्षीदार तपासले. त्यांना फिर्यादीच्या वकील ॲड. जेसिंता डेव्हिड आणि हवालदार आबासाहेब गायकवाड, चंद्रशेखर जाधव यांनी मदत केली. तर तीन महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यातर्फे ॲड. इब्राहिम शेख यांनी काम पाहिले. लक्ष्मी ऊर्फ पिंकी बालाजी जाधव (वय १९, रा. टाकळी, ता. देगलूर, जि. नांदेड) ही माफीचा साक्षीदार बनली. 

लक्ष्मी ही निकिता हिच्या घरी राहत होती. मुलाला पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने मधू आणि त्यांच्या मुलाचे अपहरण केले. त्यांना निकिताच्या घरात डांबून ठेवले होते. तिथे मधू यांच्या चेहऱ्यावर लाल मिरचीची पूड टाकली. 

आरडाओरड केल्यानंतर त्यांचा मच्छरदणीने गळा आवळून खून केला. नंतर मृतदेह मच्छरदाणीत बांधून समोर राहणाऱ्या एका महिलेच्या पलंगाखाली टाकला. तसेच त्यांचा मोबाईल फोडून पुरावा नष्ट केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life imprisonment for murder of woman