

चंचळीचा मुलगा, जगाचा प्रवासी
चंचळीसारख्या गावातून सुरू झालेला प्रवास. एका मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याने इंग्रजीची अडचण पार करत सुरुवातीला आयटी क्षेत्रात करिअर केलं, अनेक वर्षे कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली आणि त्याच काळात सोशल मीडियावर स्वतःची ओळखही निर्माण केली. आज ते ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखले जातात. जीवन कदम ब्लाॅग, जीवन कदम लाइफस्टाइल हे त्यांचे युट्यूब चॅनेल आहेत शिवाय इन्स्टाग्रामसाठीही ते व्हिडिओ करतात. जवळपास आठ लाख लोकं त्यांना फाॅलो करतात, तर १५ कोटी लोकांनी त्यांचे व्हिडिओ पाहिले आहेत. आज त्यांची स्वतःची ''जेकेव्ही ट्रॅव्हल्स'' कंपनी आहे; पण या यशामागची सुरुवात छोटी होती.
जीवन यांचं बालपण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. वडील साखर कारखान्यात वॉचमन म्हणून काम करत होते, तर आई आजही अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. या परिस्थितीत दहावीला ५४ टक्के आणि बारावीला ५६ टक्के मिळवणारा हा मुलगा पुढे काय करणार, हा प्रश्न स्वाभाविक होता. त्यात इंग्रजीची अडचण वेगळीच. ११ वीमध्ये इंग्रजीला केवळ ३५ गुण मिळाले होते. ग्रामीण भागात अशा पोरांना ‘वर पास’ म्हटलं जातं; पण त्या एका गुणपत्रिकेने जीवन यांचं आयुष्य ठरणार नव्हतं. २०१२ मध्ये जीवन कदम यांनी आयटी क्षेत्रात प्रवेश केला. पुढची जवळपास नऊ वर्षे त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं. चांगला पगार, करिअर स्थिर होतं.
२०१५ मध्ये लग्न झाल्यानंतर पत्नीसोबत नवीन ठिकाणी जाणं, तिथली माणसं पाहणं, वेगळं काही अनुभवणं आणि ते मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपणं सुरू झालं. २०१६ मध्ये त्यांनी युट्यूबवर पहिला व्हिडिओ टाकला. ठिकाण होतं तापोळा. आजच्या भाषेत सांगायचं तर तो व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला नव्हता. हजारो लोकांनी पहिल्या काही तासांत तो पाहिला नाही; पण चार-पाच महिन्यांनी त्याला ४००-५०० व्ह्यूज मिळाले. इतरांसाठी ही संख्या अगदी छोटी असू शकते. जीवन यांच्यासाठी मात्र ती तेव्हा मोठीच होती. आठवड्यातील पाच दिवस नोकरी आणि उरलेल्या वेळेत प्रवास करायचा, शूटिंग करायचं, व्हिडिओ तयार करायचा आणि पुन्हा कामावर जायचं हे त्यांचं रूटीन ठरलं. हळूहळू प्रेक्षक वाढू लागले. फिरण्यासाठी लोक माहिती शोधत होते आणि जीवन त्या माहितीला स्वतःच्या अनुभवातून युट्यूबवर सांगत होते. इथून त्यांच्या कंटेंटची खरी ओळख तयार झाली.
जीवनच्या प्रवासाचा एक मोठा भाग महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांशी जोडलेला आहे. आजवर त्यांनी २०० हून अधिक किल्ल्यांना भेट दिली आहे. त्यांचा ट्रॅव्हल कंटेंट केवळ सुंदर दृश्यांचा संग्रह राहिला नाही. त्यात माणसं आणि त्यांच्या कथा येऊ लागल्या. महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांपासून सुरू झालेला जीवन यांचा हा प्रवास पुढे देशाबाहेरही गेला. दुबई, आईसलँड, स्वित्झर्लंड यांसह आठ देशांना त्यांनी भेट दिली. परदेशात फिरताना भारताबद्दलची त्यांची नजरही बदलली. त्यामुळेच स्वित्झर्लंडमध्ये दिसणाऱ्या निसर्गाचं कौतुक करताना त्यांना काश्मीर आठवतं. मालदीवची चर्चा होताना लक्षद्वीप आठवतं. युट्यूबर म्हणून करिअर करताना एका टप्प्यावर जीवन यांच्या लक्षात आलं की केवळ व्हिडिओच्या व्ह्यूजवर अवलंबून राहणं पुरेसं नाही. त्यांच्या मागे आता एक प्रेक्षकवर्ग तयार झाला होता. त्या प्रेक्षकांच्या विश्वासातून काहीतरी व्यवसाय उभा करता येऊ शकतो. यातून ‘जेकेव्ही ट्रॅव्हल्स’ची सुरुवात झाली. फ्लाइट बुकिंग आणि ग्रुप टूर्स यांसारख्या प्रवासाशी संबंधित सेवा देण्याचा व्यवसाय सुरू झाला. केरळ, काश्मीर, हम्पी, गोकर्ण यांसारख्या ठिकाणी ग्रुप टूर आयोजित करण्यात आल्या. इथे जीवन कदम यांचा प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचतो. जो माणूस सुरुवातीला स्वतःच्या प्रवासाचा व्हिडिओ बनवत होता, तो आता इतर लोकांच्या प्रवासाचाही भाग बनू लागला. जीवन यांच्यासाठी त्यांच्या डिजिटल प्रवासातून तयार झालेला विश्वास हीच इथे मोठी ताकद ठरली. जीवन यांच्या कामाची दखल विविध पुरस्कारांच्या माध्यमातूनही आज घेतली गेली आहे. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि रेडिओ सिटी अवॉर्ड्स यांसारख्या सन्मानांनी त्यांच्या कामाला गौरवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट नक्की जाणवते. चंचळीच्या एका साध्या घरातून निघालेल्या मुलाला जग पाहायचं होतं. त्याने आधी स्वतः जग पाहिलं. मग ते जग इतरांना दाखवायला सुरुवात केली आणि आज हजारो-लाखो लोक त्याच्यासोबत त्या प्रवासात सहभागी होत आहेत. हीच जीवन कदम यांच्या यशोगाथेची दमदार गोष्ट आहे.
- सचिन सकुंडे
45661 जीवन कदम
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.