esakal | चित्रीकरणासाठी येताहेत मर्यादा; सर्वांची घेतली जाते काळजी 
sakal

बोलून बातमी शोधा

Limitations are coming for the shooting of the series

सरकारने मालिकांच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली असली तर कोरोनामुळे अनेक मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे चित्रीकरण करताना पैशांसह अनेक अडचणी येत असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.

चित्रीकरणासाठी येताहेत मर्यादा; सर्वांची घेतली जाते काळजी 

sakal_logo
By
अरूण सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

पुणे - सरकारने मालिकांच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली असली तर कोरोनामुळे अनेक मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे चित्रीकरण करताना पैशांसह अनेक अडचणी येत असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. मात्र, सर्व नियमांचे पालन करून चित्रीकरण केले जाते. तसेच, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
नीलेश मयेकर (बिझनेस हेड, झी टीव्ही) -कोरोनामुळे मालिकांच्या चित्रीकरणाला अनेक मर्यादा आल्या आहेत. "चला हवा येऊ द्या' 
या कार्यक्रमात तुम्हाला प्रेक्षकच दिसत नाही. कारण, गर्दी जमू न देणे हा त्यामागचा उद्देश आहे. आमच्या मालिका ज्या ठिकाणी सुरू आहेत, तेथील सेट सॅनिटाइज केले जातात. प्रत्येकाच्या शरीराचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल, पल्स रेट तपासून त्याची नोंद केली जाते. सर्वांचीच सेटजवळ राहण्याची सोय केली असून त्यांना बाहेर जाऊ देत नाही. तसेच, कुणाला ताप जाणवल्यास त्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. कोणाला कोरोना झाला तर त्याला क्वारंटाईन केले जाते. तसेच, चित्रीकरणही थांबविण्यात येते. या गोष्टींसाठी खर्च होत असला तरी सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे. यासाठीचा वेगळा खर्च आम्ही निर्मात्यांना देतो. त्याचबरोबर मालिकेच्या सर्व युनिटचा विमाही आम्ही उतरविला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीरेन प्रधान (निर्माते) -आमच्या "स्वामी' मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र, सर्व काळजी घेऊन आम्ही हे काम करत आहे. कोरोनामुळे चार ते पाच वेळा सॅनिटायझेशन केले जाते. तसेच, ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या असतील, त्यांनाच बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते. उर्वरित कलाकार, तंत्रज्ञ, कॅमेरामन व स्पॉटबॉय यांच्या राहण्याची व खाण्याची सुविधा आम्ही येथेच केली आहे. दिवसातून दोन-तीनवेळा सर्वांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पैसे खर्च होत असले तरी ही वेळ त्याकडे पाहण्याची नाही. विशेष म्हणजे माझ्याकडे पटकथेची बॅंक असल्याने चांगल्याप्रमाणे प्लॅन करता येते. एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे आम्ही दररोज सेटवर सर्वांचे समुपदेशन करतो. त्यामुळे त्यांच्यातील भीती दूर होण्याची मदत होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्‍वेता शिंदे (निर्माती) -सध्या कोल्हापूरमध्ये "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतो. प्रॉडक्‍शन हाऊसबरोबरच टीव्ही वाहिनीही त्यासाठी सहकार्य करत आहे. कोरोनामुळे मर्यादा असल्या तरी आम्ही मालिकेच्या पटकथेमध्ये बदल करतो. कमीतकमी पात्रांमध्ये कंटेन्ट न बदलता कसे काम करता येईल, यावर भर देतो. मालिकांचे बजेट कमी असले तरी त्यावर अनेकांना रोजगार मिळतो. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष देवून आम्ही सर्वांचाच विमाही उतरविला आहे. चित्रीकरणाच्यावेळी कॅमेरे सेट झाल्यानंतर गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाते. 

काय आहेत आव्हाने.. 
1) सरकारच्या नियमांनुसार कमी लोकांमध्ये काम 
2) लोकेशन फारसे बदलता येत नाही 
3) पावसामुळे चित्रीकरणामध्ये नेहमीच विस्कळितपणा 
4) ज्येष्ठ कलावंतांना काम करण्यास अडचणी 
5) दिवसात 22 मिनिटांच्या चित्रीकरणाचे आव्हान 
6) प्रवास सुविधेवर मोठ्या प्रमाणात मर्यादा 
7) चित्रीकरण बंद ठेवल्यास तंत्रज्ञ, कॅमेरामन, स्पॉटबॉय यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न 
8) सॅनिटायझेशन, आरोग्य सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च 

काय केल्या उपाययोजना 
1) चित्रीकरणस्थळाचे सॅनिटायझेशन 
2) सेटवरील सर्वांचीच दिवसातून दोन-तीनदा तपासणी 
3) गर्दी न होण्यासाठी योग्य ती दक्षता 
4) जेवणासाठी पत्रावळींचा वापर 
5) प्रत्येकासाठी राहण्याची वेगळी सुविधा 
6) सर्व टीमचा आरोग्यविमा 
7) बाहेरील लोकांना आतमध्ये येण्यास बंदी 
8) कमीतकमी कलाकारांमध्ये चित्रीकरण