यंदा साहित्य अकादमीचे पुरस्कारच नाहीत? मुख्य वार्षिक पुरस्कारांसाठी अर्जप्रक्रियेलाच विलंब ः बाल, युवा पुरस्कारांचीही प्रतीक्षा

यंदा साहित्य अकादमीचे पुरस्कारच नाहीत?
मुख्य वार्षिक पुरस्कारांसाठी अर्जप्रक्रियेलाच विलंब ः बाल, युवा पुरस्कारांचीही प्रतीक्षा
Published on

महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १७ ः भारतीय साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये यंदा प्रथमच खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२६ च्या मुख्य वार्षिक पुरस्कारांसाठी अद्याप अर्ज मागविण्याची जाहिरातच प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे नेहमी डिसेंबरमध्ये जाहीर होणारे मुख्य पुरस्कार यंदा त्या वेळेत जाहीर होण्याची शक्यता अंधूक आहे; तर दरवर्षी जूनमध्ये घोषित होणाऱ्या बालसाहित्य आणि युवासाहित्य पुरस्कारांचीही अद्याप घोषणा झालेली नाही.
साहित्य अकादमीची स्थापना झाल्यानंतर १९५५ पासून दरवर्षी विविध भारतीय भाषांमध्ये पुरस्कार दिले जातात. यात मुख्य वार्षिक पुरस्कारांसह बाल, युवा आणि अनुवाद विभागातील पुरस्कारांचा समावेश असतो. दरवर्षी डिसेंबरमध्ये अकादमीच्या मुख्य वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली जाते. यात काही भाषांमध्ये विशिष्ट वर्षी पुरस्कार जाहीर न झाल्याची उदाहरणे आहेत; मात्र १९५५ पासून संपूर्ण वर्षभरात मुख्य पुरस्कारांची घोषणा न झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे यंदाची परिस्थिती अभूतपूर्व ठरण्याची शक्यता आहे. याबाबत अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
अकादमीच्या मुख्य पुरस्कारांच्या प्रक्रियेला यंदा अद्याप सुरुवातच झालेली नाही. गतवर्षी ३० जानेवारीला मुख्य पुरस्कारांसाठी लेखक, प्रकाशक आणि वाचकांकडून पुस्तके मागविण्यात आली होती. यंदा ऑगस्ट आला तरी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे अकादमीच्या संकेतस्थळावर दिसत नाही.
यावर्षीच्या बालसाहित्य आणि युवा साहित्य पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्याची जाहिरात गतवर्षी ५ ऑगस्टला प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे नियमित प्रक्रियेनुसार यंदा जूनमध्ये या पुरस्कारांची घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु या पुरस्कारांची घोषणा ऑगस्टअखेरही झालेली नाही. जूनमध्ये अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक होते. त्यात बाल आणि युवा साहित्य पुरस्कारांची घोषणा होते. यंदा ती बैठकही झालेली नाही.
-----
अकादमी आणि स्वायत्ततेचा वाद
साहित्य अकादमीच्या पुरस्कारांवरून केंद्र सरकार आणि अकादमी यांच्यातील तणाव गेल्या काही वर्षांपासून वाढतोच आहे. साहित्य अकादमीचे पुरस्कार अंतिम करताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाशी सल्लामसलत करण्याची अट लागू केल्याने वाद सुरू आहे. डिसेंबर २०२५ मध्ये साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची यादी अंतिम होऊनही मंत्रालयाच्या सूचनेनंतर नियोजित पत्रकार परिषद रद्द झाली. त्यानंतर तीन महिन्याच्या विलंबाने मार्चमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले. केंद्र सरकारचा हा हस्तक्षेप म्हणजे अकादमीच्या स्वायत्ततेवर घाला असल्याची टीका साहित्यिकांनी केली होती. आता यंदाही पुरस्कारांभोवती संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com